मडगाव :
मध्य प्रदेश भाजप सरकारच्या नाताळ सणावर निर्बंध जारी करणाऱ्या परिपत्रकाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. शालेय मुलांसाठी कोणत्याही नाताळ उत्सवात भाग घेणे, ख्रिसमस ट्री सजवणे, सांताक्लॉजसारखे कपडे घालणे यासाठी सरकारची पूर्व परवानगी घेण्याचे बंधनकारक करणे आणि उल्लंघन झाल्यास कारवाईस सामोरे जाण्याचा इशारा सदर परिपत्रकात देण्यात आला आहे. यातून बोध घेत 2024 साठी गोमंतकीयांनी सावध राहणे गरजेचे आहे, असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे.
शाळांमध्ये ख्रिसमस साजरे करण्यावर निर्बंध लादणाऱ्या मध्य प्रदेशातील भाजप सरकारच्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकाचा संदर्भ देत विरोधी पक्षनेत्यांनी भाजप सरकार हुकूमशाही कारभार चालवीत असल्याचा गंभीर आरोप केला.
सर्व मुलांना सर्व भारतीय सण मुक्तपणे साजरे करू द्या. प्रत्येक सण आणि संस्कृतीचा आदर करणारा सर्वसमावेशक समाज असणे गरजेचे आहे. सण आणि परंपरांना राजकीय अजेंडांपासून दूर ठेवणे महत्वाचे आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
गोमंतकीयांनी या हुकूमशाही परिपत्रकाकडे अत्यंत सावधगिरीने पहावे. नजीकच्या भविष्यात आपल्यासाठी हेच वाढून ठेवले आहे. हा विषाणू लवकरच संपूर्ण देशात पसरेल. हे थांबवायचे असेल तर 2024 मध्ये एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
मध्य प्रदेश भाजप सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात आश्चर्यकारक काहीही नाही. गोव्यातील भाजप सरकारही त्याच दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी आधीच गोव्यातील लग्न आणि कौटुंबिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
2024 मध्ये आपल्या सर्वांना एक संधी येत आहे. आपण सर्वजण आपल्या लोकशाही आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहू या. आपण सर्वांनी फुटीरतावादी शक्तींचा पराभव करण्याची शपथ घेऊ या. हुकूमशाही राजवटीला पराभूत करण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे, असे युरी आलेमाव यांनी गोमंतकीयांना आवाहन केले आहे