म्हादईसाठी आता चर्चचाही पुढाकार
म्हादई पाणी प्रश्न ही फक्त उत्तर गोव्याला सतावणारी समस्या नव्हे तर म्हादईचे पाणी वळविल्यास त्याचे दुष्परिणाम संपूर्ण गोव्यावर होणार आहेत याची जाणीव ठेवून हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी सगळे जण एकत्र येऊन लढा अशी हाक चिखली चर्चचे पाद्री फा. बोलमेक्स परेरा यांनी दिली आहे. चिखली चर्चमध्ये झालेल्या मासमध्ये फा. परेरा यांनी हे आवाहन केले. फा. परेरा हे पर्यावरण रक्षण चळवळीत सक्रीय असून कोळसा विरोधी आंदोलनातही त्यांनी उघड भूमिका घेतली होती.
म्हादईच्या या लढ्याला दक्षिण गोव्यातूनही चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी सध्या वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न होत आहेत. याच पार्श्वभूमीवर फा. परेरा यांचा या प्रवचनाचा व्हिडिओ समाज माध्यमावर अपलोड झाला आहे. त्यात ते म्हणतात, सध्या गोव्यासमोर जी दोन मोठी संकटे आहेत त्यातील एक म्हणजे म्हादई पाणी प्रश्न आणि दुसरे रेल्वे मार्ग दुपदरीकरण. या दोन्हीं संकटांशी सर्व गोवेकरानी एकत्रित येऊन लढण्याची गरज आहे आणि सरकार जर चुकत असेल तर त्यांना त्यांची चूक दाखवुन देण्याची जबाबदारी लोकांची आहे. हे जर केले नाही तर गोवा राखून ठेवणे आम्हाला कठीण होणार असून गोव्याच्या नद्या आणि भूमी अन्य राज्यांचा माल उतरवून घेण्याची जागा एव्हढेच त्याला महत्व उरेल असे म्हटले आहे.
आरजी पक्षाने या आंदोलनात एकला चलो ही भूमिका घेतली आहे. यावर कुठल्याही पक्षाचे नाव न घेता राजकीय पक्ष स्वतःचे हित पाहून आपली भूमिका घेतात मात्र सामान्य लोकांनी त्याला बळी पडू नये. सर्व एकत्र येऊन लढले तरच विजय शक्य आहे अन्यथा नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे असे त्यांनी या प्रवचनात म्हटले आहे.