google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

… म्हणून सदानंद तानावडेनी मागावी ब्रह्मेशानंद स्वामीजींची माफी : काँग्रेस

पणजी :

भाजपचे दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या पराभवासाठी परमपूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामीजींना जबाबदार धरणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध. भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी नेहमीच धर्म, जात, भाषा यावरून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या अहंकाराला दक्षिण गोव्याने धडा शिकवला, असा दावा काँग्रेस माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला.


स्वामी ब्रह्मेशानंद यांचा गोमंतकीयांना  मतदान करण्याचे आवाहन करणारा एक व्हिडिओ जारी करून अमरनाथ पणजीकर यांनी सदर व्हिडिओमूळेच परम पूज्य स्वामीजींना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्याचा आरोप भाजपवर केला आणि सदानंद तानावडे यांनी स्वामी ब्रह्मेशानंद यांची माफी मागावी अशी जोरदार मागणी केली. राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी स्वामीजींनी आपल्या भक्तांना मतदानाचे पवित्र कार्य करण्याच्या केलेल्या आवाहनाला “धर्मगुरूंचा राजकीय हस्तक्षेप” असे संबोधणे धक्कादायक आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.


दक्षिण गोव्यात भाजपच्या आयात केलेल्या धनाड्य उमेदवाराचा मानहानीकारक पराभव झाल्याने भाजप पूर्णपणे हताश झाला आहे. हिंदू बहुजन समाज आणि एसटी समुदायाची मोठी लोकसंख्या असलेल्या फोंडा, शिरोडा, सांगे, मुरगाव, कुडचडे, मडगाव, नावेली, नुवें मतदारसंघातील लोकांनी अपेक्षेप्रमाणे भाजपला मतदान केले नाही.  विशेष म्हणजे या सर्व मतदारसंघांचे प्रतिनिधित्व भाजपचे आमदार करतात, असे अमरनाथ पणजीकर यांनी नमूद केले.


गद्दारांना पक्षात प्रवेश देऊन देव आणि जनादेशाचा विश्वासघात करणाऱ्या सर्वांना दक्षिण गोव्यातील जनतेने धडा शिकवला आहे. भाजप अध्यक्षांना त्यांच्या पराभवासाठी कोणत्याही धर्मगुरू किंवा अध्यात्मिक नेत्याला दोष देण्याचा अधिकार नाही. भाजपचा गरीब विरोधी आणि श्रीमंत समर्थक अजेंड्यामूळेच दक्षिण गोव्यात भाजपला  पराभव पत्करावा लागला आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.


परमपूज्य ब्रह्मेशानंद स्वामीजींनी दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने  कळंगुटचे थायलंड केले असे वक्तव्य करुन भाजपच्या कारभाराचा पर्दाफाश केला होता. स्वामीजींच्या सदर विधानाला कळंगुटच्या मतदारांनी दुजोरा देत  उत्तर गोव्यातील काँग्रेसच्या उमेदवाराला कळंगुटमध्ये मतांची आघाडी दिली. यामुळे संतापलेल्या सदानंद तानावडेनी स्वामीजींचे थेट नाव न घेता त्यांच्यावर आरोप केला असावा, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

भाजप नेतृत्वाचा अहंकार, हुकूमशाही, असंवेदनशीलता यामुळे दक्षिण गोव्यात त्यांचा पराभव झाला आहे. पर्यावरणविरोधी प्रकल्प, बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार हे भाजपचा पराभव करणारे प्रमुख मुद्दे ठरले आहेत. धनसेनेवर जनसेनेने मिळविलेला हा विजय आहे, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!