
आजारांबद्दल आदिवासी भागांत व्हावी जागृती… : डॉ. प्रमोद सावंत
विविध आजार व उपचारांबाबत आदिवासी भागातील लोकांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होणे गरजेेचे असल्याचे प्रतिपादन गोवा राज्याचेमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ’एम्स’ नागपूर येथे आयोजित परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.
समवेत राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री अशोक उईके, विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत ’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, MUHS FIST-25 चे संयोजक डॉ. संजीव चौधरी, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ उपस्थित होते.
यावेळी गोवा राज्याचे मा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, आदिवासींमध्ये होणारे विविध आजारावर उपचाराकरीता त्यांच्यात जागृती करणे गरजेचे आहे. परिषदेच्या माध्यमातून उपया शोधून तो त्वरीत अवलंबिण्यात यावा यासाठी प्रयत्नशील राहू. आदिवासी जनसमुदायासाठी होणारी आंतराष्ट्रीय परिषदेत आरोग्य विषयी होणारी चर्चा व त्यातून निघणारे निष्कर्ष समाजाच्या उत्थानासाठी महत्वपूर्ण ठरतील. आदिवासी समाजातील लोकांच्या कला जोपासणे गरजेचे आहे. त्याचा विकास व संवर्धन होण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. आदिवासींचे निसर्गाशी नाते जोडलेले आहे जल, जमीन व जंगल याचे संवर्धनही आदिवासी समाजाकडून करण्यात येते त्यासाठी ते निसर्गाशी जोडले गेलेल असतात. आदिवासी समुदायातील लोकांनी स्वातंत्र्य चळवळीला सुरवात केली त्यांचा देशाविषयी असलेला अभिमान सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मा. मंत्री ना.श्री. अशोक उईके यांनी सांगितले की, आदिवासींच्या आरोग्य समस्या जाणून त्यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रशासन व राज्यशासनाकडून आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येतात त्याचा लाभ सर्वानी घ्यावा. यासाठी प्रबोधन होणे आवश्यक आहे. आदिवासींची कला, परंपरा अखंडित रहावी यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. देशातील आदिवासींची भाषा, संस्कृती व परंपरा विभाग निहाय वेगवेगळी आहे त्याचे अनोखेपन जोपासणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून आरोग्य विषयक समस्यांवर उपचार व उपाय शोधनू काढणे महत्वपूर्ण असून त्याची शासनस्तरावरुन अंमलबजावणी करण्यासाठी आदिवासी विकास विभाग सकारात्मक राहिल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, आदिवासी विभागातील आरोग्याच्या समस्या सोडण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. या परिषदेतून एकत्रित माहितीवरुन योग्य उपाययोजना करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आदिवासींमध्ये प्रबोधन करण्यात येत असून त्याच्यात सकारात्मक बदल होईल असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले की, आदिवासी लोकांमध्ये सिकलसेल अॅनिमिया, कुपोशण आदी आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी ’एम्स’ प्रयत्नशील आहे. आरोग्य विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने MUHS FIST-25 च्या माध्यमातून त्याला अधिक बळकटी आली आहे. या परिषदेतील माहितीवरुन आरोग्य पॉलीसी ठरविण्यात येईल जी आदिवासींच्या आरोग्य समस्यांवर महत्वपूर्ण ठरेल असे त्यांनी सांगितले.