
दिनकर गांगल: प्रयोगशील विचारवंत आणि रत्नपारखी संपादक
कोकणात ग्रामीण साहित्य संमेलनांचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी २०२५ला वाटूळ (राजापूर) येथे होत आहे. प्रसिद्ध प्रयोगशील विचारवंत आणि रत्नपारखी संपादक-पत्रकार दिनकर गांगल (जन्म – २५ नोव्हेंबर १९३९, रोहा-रायगड) या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. त्यानिमित्ताने धीरज वाटेकर यांनी लिहिलेला विशेष लेख…
कमालीचे साधे, प्रेमळ विनम्र, ठाम आणि सुस्पष्ट विचार असलेले गांगल सर हे महाराष्ट्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोहा येथे २०११साली संपन्न झालेल्या १३व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते. साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे सरांचे आवडीचे विषय आहेत. त्यांची साहित्य व संस्कृती क्षेत्रातील कारकीर्द सहा दशकांची राहिलेली आहे. सरांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली आहे. त्यांनी साकारलेली ‘महाराष्ट्र टाइम्स‘ची रविवार पुरवणी विशेष गाजली होती. सरांना ‘फीचर रायटिंग‘ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली होती. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला. ‘फीचर रायटिंग’ मधले बापमाणूस अशी त्यांची ओळख यातूनच निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीत, घडामोडीत, जडणघडणीत सरांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे साक्षीदार असणारे गांगल सर वयाच्या ८५व्या वर्षी अमाप उत्साहाने काम करतात हे आमच्यासारख्यांना आदर्शवत आहे. सर अत्यंत धडपडणाऱ्या व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांच्या सहवासात अनेकांना नवी दृष्टी मिळाली आहे. साहित्य आणि सामाजिक व्यवहारातली अनेक माणसं ज्या वयात कालबाह्य झालेली पाहायला मिळतात, त्या वयात सरांचा डोळस सार्वजनिक वावर आश्वासक वाटतो. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ सरांच्या ठायी असल्याने आम्हालाही गांगल सर खूप जवळचे वाटतात. सरांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन), क्षितीज अपार आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड‘ ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. सरांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती‘चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ‘ व ‘मराठा साहित्य परिषद‘ यांचे संपादनाचे पुरस्कार, जागतिक मराठी परिषदेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार आणि वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण‘ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
कार्यरत होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर सरांनी १९५७ पासून प्रथम ‘केसरी’ नंतर ‘सकाळ’मध्ये काम केले. १९६४ पासून ते ‘महाराष्ट्र टाइम्स’शी अखंड जोडले गेले. सुधीर नांदगावकर यांच्याबरोबर जुलै १९६८ मध्ये ‘प्रभात चित्र मंडळा’ची (फिल्म सोसायटी) स्थापना केली होती. १९६० ते १९८० हा दोन दशकांतला काळ विविध चळवळींचा होता. बहुसंख्य मध्यमवर्ग कोणत्यातरी चळवळीत होता. त्यात वाचनाची आस असलेला मोठा समाजगट होता. त्याच्यापर्यंत पुस्तके पोहोचवीत यासाठी १९७४-७५च्या सुमारास जाणीवसंपन्न समाजासाठी वाचन आणि विचारांची एक चळवळ उभी राहिली, ती ग्रंथाली वाचक चळवळ! ही चळवळ निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान गांगल सरांचे आहे. सरांनी ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली‘ची स्थापना केली होती. ग्रंथाली पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. तिने अनेक मोठे लेखक घडवले. तळागाळातील अनेक हौशी कवी व लेखकांना हुडकून व त्यांना विविध विषयांवर लिहीण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांचे विचार समृध्द केले. ग्रंथालीने जी पुस्तके प्रसिद्ध केली त्यांपैकी ऐंशी टक्के पुस्तकांचे लेखक पहिल्यांदा लिहिते झाले होते. त्यामागे गांगल सरांचे विविध गोष्टींबद्दल असणारे कुतुहल आणि संबंधित व्यक्तींमध्ये, विषयांमध्ये त्यांना दिसलेला स्पार्क हा धागा होता. दया पवार यांचे ‘बलुतं’ किंवा नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप अन् आम्ही’ ही त्याची दोन ठळक उदाहरणे म्हणून सांगता येतील. सरांनी ‘ग्रंथाली‘च्या ‘रुची‘ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. ‘ग्रंथाली‘ची चारशे पुस्तके संपादित केली. सरांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार‘चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘ग्रंथाली’ ही साहित्याची उत्तम जाण व चोखंदळपणा यासाठी कार्यरत मराठी भाषेतील एक अग्रेसर चळवळ आहे. समाजाच्या नाडीवर अचूक ठेवले गेलेले बोट हे ‘ग्रंथाली’च्या यशाचे खरे कारण होते. जाणीवजागृत तरुणांच्या प्रखर व तीव्र संवेदना, समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील त्यांचा संघर्ष व त्यांना खुणावणाऱ्या विधायकतेमुळे ‘ग्रंथाली’कारांना लेखन-पुस्तकांचे नवनवे फॉर्म, नवनवे विषय सुचत गेले. गांगल सरांच्या शब्दात सांगायचं तर, ‘ग्रंथाली हे तत्त्वाग्रहांच्या कार्यपद्धतीतून उभी राहिलेली चळवळ आहे. ‘वाचनवेधकता’ हे मूल्य ‘ग्रंथाली’ आग्रहाने लेखकांसमोर मांडत आली. वाचकांना न कळणारे दुर्बोध साहित्य लिहिण्याची एक फॅशन मराठी साहित्यात होती. तेव्हा ‘ग्रंथाली’ने वाचकांना आवडीने वाचता येईल असे सुगम साहित्य निर्माण करण्यावर भर दिला होता. विशेष म्हणजे या ‘ग्रंथाली’ची वाटचाल ३५ वर्षांची झाल्यावर सरांनी ‘ग्रंथाली’ची सूत्रे नव्या पिढीकडे दिलीत. गांगल हे ‘ग्रंथाली‘प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा‘चे संस्थापक सदस्य आहेत. दीपक घारे यांच्या सहकार्याने २००१मध्ये त्यांनी ‘ग्रंथाली ज्ञानयज्ञ’ नावाने स्थानिक इतिहासाचे महत्त्व अधोरेखित करणारी छोट्या पुस्तिकांची मालिका तयार केली. ‘ग्रंथाली ज्ञानयज्ञ’मध्ये हजार पुस्तके निर्माण झाली असती तर ते खूप महत्त्वाचे काम ठरले असते. अर्थात यात ज्या दोन-अडीचशे पुस्तकांची निर्मिती झाली तीही खूप महत्त्वाचीच होती. २००५मध्ये ‘मराठी विद्यापीठ डॉट कॉम’ वेबसाईटची निर्मिती केली.

एकविसाव्या शतकातील ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा संवर्धित व्हावा हा हेतू मनी बाळगून सरांनी २००९मध्ये ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. याच संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ असलेले वेबपोर्टल चालवण्यात येते. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद घेण्याचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. ‘भारत देशात, महाराष्ट्रात विधायक असे काहीही होताना दिसत नाही. गुंता दिवसेंदिवस वाढतो आहे.’ असं जाणवू लागल्यास सरांनी संपादित केलेल्या ‘थिंक महाराष्ट्र’ वेब पोर्टलवर आवर्जून फेरफटका मारावा. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे ग्रंथालीचे पुढील अद्ययावत रूप आहे. एकप्रकारे त्याला मराठी विद्यापीठाचे प्रगत रूप म्हणता येईल. पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी, ‘थिंक महाराष्ट्र’चे वेबपोर्टल म्हणजे पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या संस्कृतिकोशाचे विस्तारित आधुनिक रूप असल्याचे म्हटले आहे ते खरे आहे. हे पोर्टल उद्याच्या महाराष्ट्राचे म्युझियम आणि कंटेंप्ररी जर्नल असणार आहे. सरांनी सुरु केलेल्या ‘व्हिजन महाराष्ट्र फांउडेशन’चा प्रवास कोणत्या दिशेने असणार आहे? हे समजून सांगताना, ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांनी सांगितलेली एक गोष्ट सांगतात. ‘पूर्वीच्या खेड्यातदेखील दारूचा गुत्ता, मटणाचे दुकान अशा, त्यावेळी दुष्ट मानल्या गेलेल्या गोष्टी होत्या. पण गावात दोन वारकरीदेखील असत आणि दारू प्यायलेला माणूस वारकर्यांच्या घरापाठीमागून लपतछपत स्वगृही जाई. ही दहशत नैतिक होती. समाजात सांस्कृतिक गोष्टी प्रभावी झाल्या तर असांस्कृतिकता, असभ्यता आपोआप निष्प्रभ होत जातात.’ हेच ध्येय बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ काम करते आहे. आजच्या बकालतेवर ‘सोशल नेटवर्किंग’चे साधन वापरून समाजातील संवेदनशील व विचारी वर्गाचे सामर्थ्य एकवटवावे आणि सांस्कृतिकता अधिक प्रभावी करून लोकांमधील पुढाकार घेण्याची भावना जागृत करावी, यासाठी ‘थिंक महाराष्ट्र’ प्रयत्नशील आहे.
गांगल सरांनी मांडलेल्या थिंक महाराष्ट्र कम्युनिटी (समुदाय), जन्मशताब्दी वीरांचे दालन याही संकल्पना भन्नाट आहेत. १९०० ते १९३० या काळात जन्मलेल्या महनीय मंडळींनी महाराष्ट्रीय जीवन घडवले. अशा तीनशे मोठ्या व्यक्तींची नावेसरांच्या टीमने काढलीत. या मंडळींचा अभ्यास व त्यांचे कार्य संशोधन करून ‘जन्मशताब्दी वीरांचे दालन’अंतर्गत व्यवस्थितरित्या लोकांसमोर आणले तर अवघा महाराष्ट्र चकित होईल आणि सांस्कृतिकतेचे महत्त्व लोकजीवनात परत ठसेल. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ हे मराठी माणसाची कर्तबगारी आणि विधायकता यांचे नेटवर्क आहे. ते राज्याची तर्कशुद्ध मांडणी करण्याचा प्रयत्न करते आहे. भौतिक विकासाचे मॉडेल स्वीकारले गेल्याने महाराष्ट्राच्या ‘व्हिजन’ला नव्वद सालानंतर अर्थ उरलेला नाही. महाराष्ट्र हा अमेरिकेप्रमाणेच ‘स्थलांतरितांचा देश’ (बॉयलिंग पॉट) आहे. मराठी कोणास म्हणावे? हा कळीचा प्रश्न आहे. महाराष्ट्र हा ‘मिनी इंडिया’ आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाला एकात्म उद्दिष्टाने बांधण्याचे काम आहे. हे एकात्म उद्दिष्ट वैचारिक व भावनिक असू शकते. मराठी माणसात कार्यकर्ता दडलेला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय ख्यातीचे कलाकार (भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, गायतोंडे, हुसेन आहेत) व क्रीडापटूही (गावसकर, तेंडुलकर, नाटेकर) मोठे होऊन गेले. मात्र त्यांची छाप राष्ट्रीय पातळीवर मराठी म्हणून जाणवत नाही. महाराष्ट्रात मागील पन्नास-सत्तर वर्षांत काही मराठी विद्वान हे स्वतंत्र विचार मांडू शकतील अशा ताकदीचे होते. त्यांनी त्या त्यावेळी काही विचार नोंदूनही ठेवले. ग्रंथालीने प्रकाशित केलेले ‘स्वायत्त महाराष्ट्र’ पुस्तक या पठडीतले आहे. हे पुस्तक महाराष्ट्रकेंद्री आहे. दुर्दैवाने सुप्त सामर्थ्याचे असे अनेक विचारकण त्या काळात दडपले गेलेत. त्यामुळे महाराष्ट्राची बौद्धिक हानी होऊन राज्याला बुद्धिमांद्याचा रोग जडल्याचे ठासून सांगत राज्याच्या स्थित्यंतरावर अचूक बोट ठेवणाऱ्या गांगल सरांच्या प्रतिभाशक्तीला सलाम करायला हवा.
महाराष्ट्र हा प्रदेश कर्तृत्वाचा आहे, हे गत आठशे-हजार वर्षांचा इतिहास सांगतो. मानवी भाषांवर १९९०नंतर तंत्रज्ञानाचे मोठे आक्रमण सुरू झाले. त्यामुळे भाषेद्वारे आविष्काराची गरज कमी झाली. मानवी संभाषण पर्यायाने म्हणी-वाक्प्रचार यांचा वापर, नव्या पर्यायी शब्दांचा शोध घेणे कमी झाले आहे. म्हणून इंटरनेटवरील वाचनासाठी मराठीचे रूप नव्याने विकसित व्हायला हवे आहे. महाराष्ट्राच्या तालुक्या-तालुक्यात उपक्रमशील व्यक्तींचा संचार आहे. त्यांचा आणि प्रस्थापितांचा ‘कनेक्ट’ राहिलेला नाही. उद्याचे परिवर्तन हे निर्मितीच्या प्रेरणांनी भारल्या गेलेल्या माणसांकडून होणार आहे. माणसांच्या सदसद्विवेकाची संस्कृती मागे पडते आहे. देशातील विचारी व संवेदनाशील समाज काहीसा आत्ममग्न आहे. माणसाच्या सत्त्व गुणाचे रुपांतर अतिगर्वात झाले आहे. रज गुणाने धुमाकूळ घातला आहे. हपापलेपण आणि विषयी वृत्ती हे समाजाचे ब्रीद बनले आहे. बुद्धीच्या जोरावर विवेकीपण येण्याऐवजी भोगवृत्ती वाढते आहे. प्रशासनावर वचक व पर्यायी विचार सापडत नाही आहे. मूल्यव्यवस्था ढासळते आहे. गावागावात पुतळे, मंदिरे, हॉस्पिटले बांधली जातायत. मात्र ग्रंथालय असायला पाहिजे असा आग्रह दिसत नाही. विद्वेष, विखार, विषमता हे सद्यकाळाचे दुखणे आहे. त्यामुळे संवेदनाशील व विचारी मनांमध्ये अस्वस्थता येते. माणसाची संवेदनेची पातळी कमी होत चालली आहे. सामाजिक कामांवर पैसा खर्च करण्याविषयीच्या संकल्पना खूप ठोकळेबाज असतात. गरजूला मदत करणे म्हणजे सामाजिक कामांवर पैसा खर्च करणे नाही. मन घडविण्याच्या कामांसाठी कोण काय करणार? याचा विचार करायला हवा. अशा मुद्द्यांवर गांगल सरांमधील भाष्यकार-निरीक्षक अचूक बोट ठेवतो. पर्याय म्हणून राज्यात तालुकास्तरावरील जीवनाचा-परंपरेचा व प्रगतीचा वेध घेणाऱ्या तालुका संस्कृती महोत्सवाची कल्पना राबवतो. समाजप्रबोधन व साहित्य संशोधन यांमधून तयार झालेल्या पिढीचा प्रभाव मराठी समाजावर १९४५ ते १९८० या काळात निर्विवाद होता. त्यानंतर हे सारे बिघडत गेले. नव्वद सालानंतर जागतिकीकरणाच्या रेट्यात केवळ पैशाला असाधारण महत्त्व प्राप्त होऊन इतर सारे दिशाहीन झाले. पूर्वी बहुसंख्य समाज अशिक्षित असूनही तो संस्कृतीच्या उत्तम कल्पना जोपासून होता. आज परिस्थिती उलटी आहे म्हणून समाजात सुसंस्कृत समाजाचा प्रभाव वाढायला हवा अशी सरांची अपेक्षा आहे. जुन्या मराठी साहित्यिकांच्या व कलाकारांच्या वेबसाईटस्ची निर्मिती, कला आणि करमणूक यांचा बिघडलेला तोल पुनर्स्थापित करण्यासाठी गांगल सरांनी रसिकतेचा अभ्यासक्रम उपक्रम सुरु करण्याची सूचना केली आहे.

बदलत्या काळात पुस्तकाची देवघेव करणाऱ्या ग्रंथालयांना सांस्कृतिक केंद्राचे नवे, विस्तारित रूप घ्यावे लागणार आहे. विविध ज्ञान संकलन व ज्ञान प्रसारण हे ग्रंथालयांचे मुख्य कार्य असायला हवे आहे. याविचारानेही सरांनी चळवळ सुरु केली आहे. सद्यकाळात मानवी भावना व्यक्त करण्याचे माध्यम पैसा आहे. ज्ञानाचा विस्तार प्रचंड झाला आहे. माहिती-ज्ञान सर्वत्र खुलेपणाने उपलब्ध आहे. गुरू गुगलबद्ध झाला आहे. मराठी प्रकाशन व्यवसाय आजही काहीसा संकटात आहे. हा व्यवसाय सरकारावलंबी राहिला आहे. पुस्तकांची लोकांमधील विक्री ही फार मोठी कधी राहिलेली नाही. साहित्य-कला-संस्कृती हे प्रश्न या समाजात कधी अग्रस्थानी आले नाहीत. जिज्ञासा, ज्ञानोत्सुकता यांना समाजात दोन-तीन टक्क्यांचे स्थान राहिले आहे. मागील दोनेकशे वर्षांपासून समाजात वावरणारे पुस्तक हे ज्ञानोत्सुकतेचे प्रतिक आहे. ‘पुस्तक व्यक्तीला घडवते’ यावर जिद्यासूंचा विश्वास आहे. असे नमूद करणारे गांगल सर, ‘वाचकाची भूक नव्या कंटेण्टची असण्याकडे मराठी पुस्तकांना पाहायला लागेल’ असं सांगून जातात तेव्हा त्यांच्यातील विचारवंताचे दर्शन घडते. सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे आहेत. सर आजही वाचकांस काय हवे आहे? याचा प्रथम विचार करताना दिसतात. एखादा शब्द लिहिला नाही तर वाक्यात काही फरक पडेल का? संबंधित शब्द भविष्यात वापरात राहिल का? याबाबत त्यांचा कटाक्ष असतो. ते रोज नव-नव्या व्यक्तींशी संवाद साधतात. व्यक्तींविषयी आपल्या साप्ताहिक स्तंभात लिहितात. अनेकांच्या लेखनावर संस्करण करतात. अनेक वर्तमानपत्रांसाठी विविध लेखकांचे साहित्य स्वतः संस्कारित करतात. सध्याच्या साहित्य क्षेत्रातील अशा मंडळींची यादी खूप मोठी आहे की ज्यांचे पहिले लेखन गांगल सरांनी संस्कार करून महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध करून त्यांना नावारूपास आणले होते. असे गांगल सरांचे आम्हाला जाणवलेले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ, विचारी, व्यासंगी व मजकुराशी प्रामाणिक असलेल्या शैलीदार संपादकाचे आहे. सर रसिक, संवेदनशील आहेत. आमच्यासारख्या उभरत्या तरुणांना सरांसारख्या ज्येष्ठाने हात देणे, त्यांचे सान्निध्य मिळणे मौलिक वाटते. एका पत्रकाराची दृष्टी किती व्यापक आणि शोधक हवी हे सरांच्या कामाचा आढावा घेताना जाणवते. सरांची संपादकीय नजर, समाजभान, अपार औत्सुक्य आमच्यासारख्यांना समृध्द बनवते.
८५व्या वर्षी सरांचा उत्साह, उत्तम ते जतन करण्याबाबतचा आग्रह, आमच्यासारख्याचा एखादा लेख लिहून पूर्ण झाल्यावर त्यातील राहिलेले बारकावे समजावून सांगत नव्याने लेखन घडवण्याचा आग्रह अफलातून आहे. महाराष्ट्रात सेवाजेष्ठतेनुसार अनेक संपादक झाले असतील पण अनेक नवीन विषय व लेखक घडवणारे गांगल सर ही एक व्यक्ती नसून संस्था आहे. सरांसारखा बहुश्रुत व व्यासंगी संमेलनाध्यक्ष मिळणं म्हणजे भाग्यच म्हणायचं. ‘मराठीत संपादक दोन प्रकारचे राहात आले आहेत. एक लिहिणारे, दुसरे संयोजक संपादक. वाचकांना लिहिणारे संपादक जास्त आवडतात.’ सरांचे हे विधान आजच्या काळात सोशल मिडीयावर ‘ब्रेकिंग न्यूज’चा धुमाकूळ घालणाऱ्या ‘ऑनलाईन’ पत्रकार-संपादकांनी समजून घ्यावे. वर्तमानकाळात वावरत असताना वर्तमानाच्या पलिकडे कुतुहलपूर्वक नजरेने पाहाण्याची दृष्टी लाभलेल्या ‘संमेलनाध्यक्ष’ दिनकर गांगल सरांना या ग्रामीण संमेलनात ऐकायची संधी सोडू नका!