
गोमंतकियांना ‘का’ पाहिजे पोर्तुगीज पासपोर्ट?
– वामन प्रभू
पोर्तुगीज पासपोर्टची महती तशी बर्याच काळापासून जाणून होतो. मी स्वतः जन्माने पोर्तुगीज नागरिक होतो आणि जन्मानंतर साधारण दहा अकरा वर्षानंतर गोवा मुक्त झाल्याने आम्ही सगळेच भारतीय नागरिक बनलो . त्याचा आनंद आज बासष्ट वर्षांनंतरही तसूभर कमी झालला नाही वा तसा तो होणेही अपेक्षित नाही. पोर्तुगीज म्हटले की आज सहा दशके ऊलटल्यानंतरही आमच्यासारखे अनेक जण ‘ते पोदेर गेले आनि ते ऊंडेय गेले ‘ हे ब्रह्मवाक्य अजूनही ऐकत आहोत .
फुटबॉलच्या रूपाने पोर्तुगीजांनी दिलेली देणगी आनि समान नागरी कायद्याच्या रूपाने आम्हाला त्यांच्याकडून मिळालेल्या अमौलिक भेटीवरही चर्चा करताना आपण कधीही थकत नाही. काहीना अजूनही अन्य काही कारणांवरून पोर्तुगीज आठवतही असतील आणि त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे आजही संपूर्ण गोव्यावर टाकले गेलेले पोर्तुगीज पासपोर्टचे मायाजाल. या मायाजालात आजवर दोन ते अडीच लाख गोमंतकीय अडकले गेले आहेत आणि ॲड आयरिश रॉड्रिग्ज यांच्यासारखा फायरब्रॅन्ड सामाजिक कार्यकर्ताही नुकताच या मायाजालात अडकल्यानंतर नजिकच्या काळात अजून किती गोमंतकीय नागरिक भारतीय नागरिकत्व आणि मताधिकार डावलून तोच मार्ग स्वीकारतील याचा आताच अंदाज बांधता येणार नाही. पोर्तुगीज पासपोर्टच्या मायाजालात सापडलेल्या अनेकानी त्या संधीचे सोने करून आपली आणि कुटुंबियांची आर्थिक स्थिती सुधारली असेलही परंतु आज सहा दशकानंतरही गोमंतकीयांचे पोर्तुगीज पासपोर्टचे आकर्षण अजिबात कमी झालेले नाही वा होणारही नाही हेच स्पष्ट चित्र पुढे येत आहे.
आयरिश राॅड्रीग्ज आताही आपला विषय वेगळा असल्याचा दावा करताना दिसतात आणि त्यात तथ्य असेलही पण जगातील जवळपास १८८ देशांचा व्हिसा पोर्तुगीज नागरिकत्व मिळवल्यानंतर आपसूकच विनायासे ऊपलब्ध होतो याच कारणावरून जर भारतीय नागरिकत्व झिडकारून पोर्तुगीज पासपोर्ट त्यानी घेतला असेल तर या पासपोर्टमुळे युरोप वा अन्य काही देशातील मिळणाऱ्या रोजगाराच्या वा अन्य संधी साध्य करून घेण्यासाठी युवा पिढीने पोर्तुगीज पासपोर्ट मिळवला तर त्यांचे चुकतेय असे म्हणता येणार नाही आणि आज नेमके हेच घडतेय हे परराष्ट्र मंत्रालयाकडून ऊपलब्ध करण्यात आलेल्या एका आकडेवारून दिसून येते.
२०११ ते २०२२ दरम्यानच्या अकरा वर्षांच्या काळात सत्तर हजारांहून अधिक भारतीय नागरिकानी आपले पासपोर्ट देशातील वेगवेगळ्या विभागीय पासपोर्ट कार्यालयात ‘सरेंडर ‘ केल्याचे ही आकडेवारी सांगते आणि यामध्ये गोवा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू , दिल्ली आणि चंदिगढ या आठ प्रदेशातील नागरिकांची संख्या ९० टक्क्याहून अधिक भरते आणि त्यातही विशेष असे की भारतीय नागरिकत्व सोडून देऊन पोर्तुगीज पासपोर्ट धारण करणाऱ्यांमध्ये गोमंतकीय नागरिकांची संख्या तब्बल ४0 टक्क्याहून अधिक आहे. याचाच साधासुधा अर्थ असा की ज्या ७०हजार भारतीयांनी या काळात आपले नागरिकत्व सोडले त्यामध्ये केवळ गोमंतकीयांचीच संख्या २८-२९ हजारांपेक्षा अधिक आहे. भारतीय नागरिकत्व सोडून पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्याचा हा सिलसिला मागील बरीच वर्षे कायम असून आजही गोव्यातील पोर्तुगीज वकिलातीच्या कार्यालयासमोर दिसणार्या भल्या मोठ्या रांगा त्याची ग्वाहीच देत आहेत.
आयरिश रॉड्रिग्ज यांच्यासारख्या फायरब्रॅन्ड सामाजिक कार्यकर्त्याने कोणत्याही कारणास्तव का होईना आज पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारल्यामुळे पोर्तुगीज पासपोर्टधारकाला मिळणार्या सवलतींबाबत अधिकच विस्ताराने गोव्यात आता चर्चा होऊ लागली असून पोर्तुगीज पासपोर्टचे भूत कायम डोक्यात ठेवून येथे मिळेल ती नोकरी वा रोजगार स्वीकारणार्याना आयतेच बळ मिळाले आहे आणि अनेकांच्या डोक्यात पोर्तुगीज पासपोर्टचा कीडा त्यामुळे नव्याने वळवळू लागला असेल तर त्याचे नवल वाटायला नको. गोवा मुक्तीआधी या प्रदेशात जन्म घेतलेल्या माझ्यासारख्या नागरिकांच्या पुढील तीन पिढ्यांपर्यंतच्या वंशजाना पोर्तुगीज पासपोर्ट वा त्याद्वारे पोर्तुगीज नागरिकत्व मिळू शकते म्हणजेच अजून बरीच वर्षे गोमंतकीयांवर विशेषकरून युवा गोमंतकीयांवर पोर्तुगीज पासपोर्टचे मायाजाल कायम रहाणार असून गोव्यातून नोकरी वा अन्य कामासाठी पोर्तुगालच्या महाद्वारातून विदेशात जाऊन आर्थिक बरकत प्राप्त करण्याच्या ध्येयाने त्याना पछाडले गेल्यास त्याना दोष देता येणार नाही. वंश प्रस्थापित करण्यासाठी पोर्तुगीज नागरिक म्हणून आवश्यक प्रमाणपत्रांसह पोर्तुगालमध्ये जन्माची नोंदणी केल्यास लिस्बनमध्ये एक दोन दिवसातच पोर्तुगीज पासपोर्ट कसा ऊपलब्ध होऊ शकतो यावरही आयरिश रॉड्रिग्ज यांनी आपण स्वीकारलेल्या पोर्तुगीज नागरिकत्वाचे समर्थन करताना स्पष्ट केल्याने अनेकांचा ऊत्साह बळावलाही असेल, भारतीय नागरिक म्हणून पोर्तुगाल भेटीवर गेलेले आयरिश रॉड्रिग्ज पोर्तुगीज पासपोर्टच्या आधारे पोर्तुगीज नागरिक म्हणून गोव्यात परतले आहेत याचीही दखल अनेकानी घेतली असेलच.
पोर्तुगीज पासपोर्ट हा कोणालाही अनेक युरोपियन आणि अन्य ब-याच देशात व्हिसामुक्त प्रवेश देणारा आधार तर आहेच पण त्याचबरोबर पात्रतेच्या वा अफाट गुणवत्तेच्या आधारे कोणीही आपले करियर करायची महत्वाकांक्षा बाळगून योग्य ती संधी साधण्याचा प्रयत्न करत असेल तर पोर्तुगालचे महाद्वार त्यासाठी खूपच ऊपयुक्त ठरू शकते . आजवर असंख्य गोमंतकीयानी याचा फायदा घेतला आहे हे नाकारता येत नसले आणि आजही हाच मार्ग स्वीकारून पुढे जाण्याकरिता अनेकजण ऊत्सुक असले तरी भारतीय नागरिकत्व आणि मतदानाच्या पवित्र हक्काचा त्याग करताना तसा कठोर निर्णय घेणे अनेकांसाठी कठीण जाते. दोन अडीच लाख म्हणजे गोव्याच्या आताच्या लोकसंख्येच्या सुमारे १५ टक्के गोमंतकीय नागरिकानी पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारले आहे असे म्हणण्यापेक्षा भारतीय नागरिकत्व सोडले आहे असे म्हटले तर ते अधिकच वेदना देणारे आहे. गोवा मुक्तीला सहा दशकांहून अधिक काळ ऊलटला तरी हा सिलसिला कायम रहावा याचाही खेद होणे अपरिहार्य आहे. अनिवासी भारतीय एकूण देशाच्या वा त्याच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देत आहे ही वस्तुस्थिती मान्य करूनही मोठ्या प्रमाणावर होणारी ‘ब्रेन ड्रेन ‘ रोखण्यात आपण अपयशी का ठरत आहोत याचाही विचार अंतर्मुख होऊन करावा लागेल.
(गोवन वार्तामध्ये पूर्वप्रकाशित.)