google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
लेख

पेशवे आणि ब्रिटिशांना टक्कर देणारे छत्रपती प्रतापसिंह !

–  डॉ.श्रीमंत कोकाटे

अत्यंत कठीण काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले लोककल्याणकारी राज्य टिकवून ठेवणारे कर्तृत्ववान छत्रपती म्हणजे सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज (पहिले)! त्यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1793 रोजी झाला. त्यांचे वडील दुसरे छत्रपती शाहू महाराज तर मातोश्री आनंदीबाई होत्या. शाहू महाराजांच्या अकाली मृत्यूनंतर वयाच्या पंधराव्या वर्षी (1808) ते सातारच्या गादीवरती आले. त्यावेळेस पेशवेपद दुसऱ्या बाजीरावाकडे होते.

दुसर्‍या बाजीराव पेशव्याने छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली, कारण छत्रपती शिकले तर शहाणे होतील आणि ते शहाणे झाले तर आपल्या अंकित राहणार नाहीत, या दुष्ट भावनेने त्याने छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली. छत्रपतीना चोरून शिकवतील म्हणून दुसऱ्या बाजीराव पेशव्याने सातारच्या राजवाड्याभोवती गुप्तहेर नेमले. त्र्यंबक डेंगल्यासारखा पेशव्यांचा सरदार हा छत्रपतींवर करडी नजर ठेवून होता. तेव्हा बाळ प्रतापसिंह यांना त्यांच्या मातोश्री आनंदीबाई मध्यरात्री चोरून शिकवत असत. पेशवाईत छत्रपतींची ही अवस्था तर सर्वसामान्य रयतेचे किती हाल होत असेल, याची कल्पना न केलेली बरी. मातोश्री आनंदीबाई यांनी निर्भीडपणे प्रतापसिंह महाराजांना शिकविले. त्यांना उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत बनविले.

ऐन तारुण्यात छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी सातारच्या गादीचा कारभार आपल्या हाती घेतला. त्यांनी सातारा शहरामध्ये राजवाडा बांधला. जलमंदिर बांधले. मराठी, इंग्रजी, संस्कृत पाठशाळा सुरू केली. सैनिकी प्रशिक्षण देणारी शाळा सुरू केली. स्वतःच्या कन्या गजराबाई या देखील त्या सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. सातारा शहरात त्यांनी छापखाना सुरू केला. त्यांनी अनेक ग्रंथ छापून घेतले. छत्रपती प्रतापसिंह महाराज हे स्वतः विद्याव्यासंगी होते. सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी येवतेश्वर डोंगरावर तलाव बांधला आणि त्या तलावाचे पाणी यवतेश्वर डोंगरावरून खापरी नळीने सातारा शहरात आणले. सातारा शहराचा कायापालट छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी केला.

दुसऱ्या बाजीराव पेशव्याने छत्रपती प्रतापसिंह महाराजांना प्रचंड छळले. त्यांचा पदोपदी उपमर्द केला. त्यांना राजवाड्यात नजरकैदेत ठेवले. तसेच वासोटा येथे देखील छत्रपती व त्यांच्या परिवाराला नजरकैदेत ठेवले. छत्रपती पदाची पायमल्ली करण्याची कोणतीही संधी दुसऱ्या बाजीरावाने सोडली नाही. दुसर्‍या बाजीरावाच्या या कपटकारस्थानाला वैतागलेल्या चतुरसिंग भोसले यांनी पेशव्याविरुद्ध बंड पुकारले. बाजीरावाने छत्रपतींचा लावलेला छळ त्यांना सहन झाला नाही. ते सैन्य घेऊन पुण्याकडे पेशव्यांचा पराभव करण्यासाठी निघाले. परंतु ते बंड पेशव्यांचा सेनापती बापू गोखले, त्र्यंबक डेंगळे यांनी मोडून काढले. छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा आधारस्तंभ चतुरसिंग भोसले यांना दुसऱ्या बाजीरावाने पकडून कांगोरी किल्ल्याच्या कैदेत टाकले. तेथे त्यांना हाल हाल करून ठार मारण्यात आले. चतुरसिंगांच्या हत्येमुळे छत्रपतींचा आधारस्तंभ गेला. छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या चांगुलपणाचा दुसऱ्या बाजीरावाने गैरफायदा घेऊन प्रचंड छळ केला.

इंग्रजांचा गव्हर्नर जनरल एलफिन्स्टन, स्मिथ, स्टोस्तन यांनी खडकी, कोरेगाव (भीमा) आणि आष्टी येथील युद्धात पेशव्यांचा पराभव केला. पेशव्यांच्या पराभवानंतर एलफिस्टनने छत्रपती प्रतापसिंह महाराजांना सातारच्या गादीवरती राज्यकारभार करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. 1818 ते 1822 यादरम्यान ग्रँट डफ हा सातारा येथे रेसिडेंट होता. त्याचे आणि प्रतापसिंह महाराज यांचे संबंध अत्यंत चांगले होते. या संबंधामुळेच मराठ्यांचा वैभवशाली इतिहास ग्रँट डफ लिहू शकला. छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी त्याला पुर्णतः सहकार्य केले. डफ नंतर आलेल्या रॉबर्ट ग्रँट, कारन्याक, ओव्हान या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराजांना प्रचंड त्रास दिला. ब्रिटिश धार्जिना आणि छत्रपती द्वेष्टा बाळाजीपंत नातू याने छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याविरुद्ध अनेक कटकारस्थाने केली.

छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे लोककल्याणकारी राज्य नष्ट करण्याचा चंग बाळाजीपंत नातू याने बांधला होता. इंग्रज अधिकारी आणि बाळाजीपंत नातू यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराजांना 1839 साली मध्यरात्री राजवाड्यातून बाहेर काढले आणि साताऱ्यापासून जवळ असणाऱ्या लिंब गावातील जनावरांच्या गोठ्यात ठेवले, तेथून काशी येथे स्थानबद्ध केले.  छत्रपती प्रतापसिंह महाराजांना न्याय मिळावा यासाठी रंगो बापूजी यांनी लंडनमध्ये जाऊन निःस्वार्थ भावनेने वकिली केली. परंतु त्यांना त्यात यश आले नाही.
अखेर वाराणशी येथेच छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचा 14 ऑक्टोबर 1847 रोजी दुर्दैवी अंत झाला.

-डॉ.श्रीमंत कोकाटे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!