google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
लेख

भंगणाऱ्या शब्दांच्या यमकांत न भंगणारे अभंग

– सचिन दिलीप अहिरे

अहिराणी भाषेचे अभ्यासक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांचे ‘भंग अभंग’ हे पुस्तक म्हणजे जीवनाचा वर्तमान काळ होय. एकूण चार काव्यसंग्रहांसह काही ग्रंथांची निर्मिती असलेले कवी, कथाकार, कादंबरीकार, संशोधक, समीक्षक, भाषा अभ्यासक, संपादक, मराठीतील सुप्रसिद्ध लेखक डॉ. सुधीर देवरे यांचे ‘भंग अभंग’ या पुस्तकाचे परीक्षण करताना विशेष आनंद होत आहे.

‘भंग अभंग’ या पुस्तकात कवीने नवनवीन शब्दांचा- घडवलेल्या शब्दांचा- बोलीभाषा- अहिराणी भाषा यांचा अप्रतिम असा वापर केलेला दिसून येतो. शब्दांचा खरा महिमा आणि शब्दांची जादू अनुभवायची असल्यास वाचकांनी ‘भंग अभंग’ अवश्य एकदा हातात घ्यावे. डॉ. देवरे यांच्या कविता म्हणजे एक प्रकारची समीक्षाच असते.


भंगू पाहणाऱ्या अभंगांना भंगू पाहणाऱ्या यमकांनी सजवून भंगणार नाहीत अशा चिरेबंद शब्दांकडून जीवन काव्यबद्ध करण्याचे कौशल्य ‘भंग अभंग’ या काव्यसंग्रहात दिसून येते. जसजसा समाज बदलत गेला तसतसे आचार- विचार बदलत गेले, जीवन जगण्याची रहाटी बदलत गेली. सत्य, सत्व, तत्व त्याचबरोबर साहित्याची रूपेही बदलत गेली. मात्र या विखुरलेल्या समाजातील परिवेश या समग्र कवितेत लोकसंस्कृतीसह उपयोजित झाला आहे. शारीरिक अवयवांसंबंधीचा मुक्तछंद वार्तालाप इथे होत राहतो. इंद्रियनिष्ठ अनुभव कथन करताना नैसर्गिक प्रामाणिक दृष्टीकोन दिसून येतो. लैंगिक जाणिवांच्या बाबतीत कवीच्या हातून अश्लील, धडक, अनैसर्गिक लेखन न होता मानवी जीवनाचा सहज नैसर्गिक भाग नैतिकता सांभाळून केलेले लेखन ‘भंग अभंग’ मध्ये पहावयास मिळते.

‘देहात मैथुन’, ‘बोधी’ या कवितांतून अनेक अर्थ प्रतित होतात. ‘वस्त्र वाऱ्यावर’ या कवितेतून तारुण्यातील स्त्रीच्या भावभावना तसेच तिच्या अल्लड वयाच्या स्तंभित करणाऱ्या व्यथा आणि समाजाच्या नजरा यांचा सुरेख संगम चित्रीत झाला आहे. कवितेतील अवघ्या काही शब्दांत खूप मोठे सत्य सहज सांगितले जाते. ‘आशा’ कवितेत मानवी मन प्रतिबिंबित होते, आशेपोटी मनुष्य भविष्यकाळात जगताना दिसतो, याचे सुंदर चित्रण येते. ‘जिथं तिथं डोकं’ या कवितेतून संसारिक भावभावनांचा मेळ, तर ‘माझ्या घरा’ या कवितेतून कवीने समाज मनाला एक आगळावेगळा संदेश मिळतो, आहे त्यात समाधानी असावे. समाधान हेच मनाचे खरे सुख आहे, अशा आशयाची ही कविता अर्थबोधित करते.

‘माणुसकी’ या कवितेतून कवीने माणसांमधील भेदाचे वर्णन केलेले आहे. सर्वच माणसे जरी माणुसकीने वागत नसली, तरी माणसांमध्ये माणुसकी शिल्लक आहे आणि माणुसकी जपणारी माणसेही आहेत, अशा विरक्त आणि आशादायी भावना कवितेतून कवी मांडताना दिसतात. ‘मूर्ती’ कवितेतून चंद्रभागेजवळ वास्तव्य असणाऱ्या विठ्ठलाचा महिमा विठ्ठल भक्तांना उद्देशून व्यक्त होतो. ‘पगार गोकुळ’ या कवितेतून कवीने महिना अखेरीस मिळणाऱ्या व उदरनिर्वाहासाठी खर्च होणाऱ्या आणि त्यासाठी रात्रंदिवस कारकूनी करणाऱ्या वर्गाचे वर्णन केलेले दिसून येते. ‘असो समाधानी’ या कवितेतून कवीने शेअर मार्केटचे वर्णन केलेले असले तरी समाधानी राहण्याचे सूत्रही त्यात सांगितलेले आहे. कर्ज काढून जगणाऱ्या समाजाला एक नवा संदेश कवीने दिलेला आहे. ‘आदिवासी कवी’ या कवितेतून कवीने आदिवासी शब्दाची उकल केलेली असून साहित्यातला पहिला कवी हा आदिवासीच असल्याचे भान आणून दिले आहे.

‘जोडलेला अर्थ’ या कवितेतून कवीने कागदावर लिहिलेल्या पेनाच्या चुकांचा उल्लेख केलेला असला, तरी जीवन जगत असताना केलेल्या चुकांवर मनुष्य कसे पांघरून घालत जातो याचा विचार करावयास भाग पाडणारी ही कविता आहे.
म्हणून ‘सावल्यांच्या आव्हानात’ ही कविता पाहू :
‘इतकी पानं गळून गेली
झाड काही वठत नाही
एवढी धूळ उडून गेली
भुई काही झिजत नाही
आक्खा सूर्य गिळूनही
सृष्टी काही कण्हत नाही
– सावल्यांच्या आव्हानात
सूर्य दिशा भुलत नाही.’
या कवितेतून कवीने संकटांना सामोरे जाण्यासाठी अतिशय सुंदर शब्दांचा वापर केलेला दिसून येतो. आयुष्यात थोडे जरी संकट आले तरी माणसे डगमगून जातात. मात्र कितीही संकटे आली तरी खचून न जाता, घाबरून न जाता त्या आव्हानांना सामोरे गेले पाहिजे, अशा भावना कवी या कवितेतून व्यक्त करीत आहे. कवितेतून संदेश देताना कवी म्हणतात की, सूर्य मावळला म्हणून तो परत उगवणं विसरत नाही, झाडाची पाने कितीही गळली तरी नवीन पालवी फुटल्याशिवाय रहात नाही. प्रयत्न करीत राहणे ही किमया मानवाने निसर्गाकडून शिकावी असा बोध या कवितेतून होताना दिसतो.

‘किती मोठी हौस’, ‘दोन दिशीच’ या कवितांतून कवीने निसर्गाचे वर्णन केलेले दिसून येते. ‘कानोसा’ या कवितेतून कवीने कवीच्या मनातील भावना व्यतीत केलेल्या दिसून येतात. कविता म्हणजे हे एक प्रेमच आहे. ‘आपल्या इतकं’ या कवितेत कवीचा शब्दांमधला सहज भाव लक्षात येतो. ‘टाळ्या’ या कवितेतून सामाजिक संवेदना दर्शवताना कवी समाजातील विशिष्ट राजकारणी लोकांचा उल्लेख करताना म्हणतात की, भ्रष्टाचारी देखील स्वतःची वाहवा करून घेतात, तर ‘हवाई ईस्टेट’ या कवितेत कवी आजच्या समाजातील गरीब- श्रीमंत दरी दर्शवू इच्छितात.

‘भंग अभंग’ हे पुस्तक म्हणजे समकालीन जीवन जाणिवांची वास्तवता होय. मानवाने कितीही प्रगती केली तरीदेखील निसर्गापुढे तो अतिशय शुद्र आहे याची जाणीव कवीने वेळोवेळी करून दिलेली दिसून येते. मानवाने प्रगतीचा कळस गाठला असला तरी त्याला आता उलट्या दिशेने प्रवास करावा लागेल असे कवी म्हणतो.

कवीने आपल्या कवितांमधून भविष्याचा वेध घेतलेला आहे. आनंद, दुःख, खेद, खंत, हर्ष, सुख, विलाप हे जीवनातील अविभाज्य भाग आहेत. मात्र जीवन जगत असताना आपण काय मिळवलं आणि काय गमावलं याचं चिंतन प्रत्येक मानवी मनाला होत असतं. अशाच आत्मनिष्ठ संवेदना मानवी भविष्याविषयी कवीने नमूद केलेल्या दिसून येतात. “या देहात मन रमत नाही / देह उसना घेता येत नाही.” या कवितेतून कवीने आपल्या मनाच्या अंतरीक भावना हृदयातून व्यक्त केलेल्या दिसून येतात.

डॉ. सुधीर देवरे यांच्या कवितेत अगदी सहजता असली तरी कवितेतील भावविश्व हे व्यापक आहे. बर्‍याचशा रचना अभंगात तर काही मद्दाम तोडलेल्या अभंगात- म्हणजे मुक्तछंदांत आहेत. संग्रहातील कवितांची विभागणी कवीने तीन भागात केलेली दिसून येते. भाग एक मध्ये ‘भंगणारे अभंग’. यातील कविता अभंग रचनेतील वैचारिक कविता दिसून येतात. भाग दोन मध्ये ‘भंगणारी यमकं’ ही विविध विषयांशी निगडित मात्र व्यापक भावविश्वाचे आहेत. तर भाग तीन मध्ये ‘भंगणारे शब्द’ या मथळ्यातील कविता म्हणजे कवी मनातील भावोत्कट कल्पनाच. थोडक्यात, ‘भंग अभंग’ म्हणजे भंगणाऱ्या शब्दांच्या यमकांत न भंगणारे अभंग.

पुस्तक- भंग अभंग
कवी- सुधीर राजाराम देवरे
प्रकाशक- सहित प्रकाशन, गोवा
पृष्ठ संख्या- १६३
किंमत- २०० रुपये

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!