अदिती कोरगांवकर मडगाव लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी
मडगाव :
लायन्स क्लब ऑफ अलेम डी मडगावचा 46 वा स्थापना सोहळा 8 जुलै 2023 रोजी दैवद्य भवन, मडगाव येथे आयोजित करण्यात आला होता. मडगाव येथील वास्तुविशारद अदिती कोरगावकर यांनी 2023-24 या वर्षासाठी अध्यक्षपद स्वीकारले. राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी सुभाष फळदेसाई यांनी व्यावसायिकांनी समाजाप्रती सामाजिक बांधिलकी असण्याची गरज प्रतिपादित केली. त्याचप्रमाणे लायन्स क्लबच्या माध्यमातून होत असलेल्या विविध सामाजिक कामाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी बोलतांना फळदेसाई यांनी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या विभागाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी सरकारच्या प्रयत्नांना बळ देण्याचे आवाहनही त्यांनी समाजाला केले. गोव्यात पार पडलेल्या ‘पर्पल फेस्ट’ला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी यावेळी नागरिकांचे आभार मानले.
क्लबच्या अध्यक्षा या नात्याने आपल्या भाषणात आदिती कोरगावकर यांनी संस्थेच्या उभारणीत तरुण मनांना सहभागी करून घेण्यावर भर दिला. कोविड नंतरच्या परिस्थितीने सामाजिक अपंगत्व निर्माण केले आहे आणि केवळ सामूहिक प्रयत्नांनीच आपण समाजाची पुनर्बांधणी करू शकतो. कोरोनाच्या अस्थिर मनस्थितीची काळात नव्या पिढीच्या शिक्षणाची आबाळ झाली त्याचा परिणाम दूरगामी होऊ शकतो याकडे लक्ष वेधतानाच, आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तरुणाईला अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आदितीने यावेळी नमूद केले.
यावेळी सुषमा वेंगुर्लेकर यांना सचिव आणि इव्होन रॉड्रिग्स यांना कोषाध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. जयमोहन नाईक यांनी क्लबच्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाला पदाची शपथ दिली. लायन्स क्लब ऑफ सालसेतच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.