‘गद्दार आमदारांनी घातले पक्ष निष्ठेचेच श्राध्द’
पणजी :
हिंदू धर्मात महत्वाचा मानला जाणारा पितृ पंधरवडा सुरू आहे. आपल्या पक्ष निष्ठेचे श्राध्द घालणाऱ्या गद्दार आमदारांनी भाजपच्या पिंडाला शिवण्याची जी अपवित्र कृती केली आहे आणि शपथ मोडून देवाशी थट्टा केली आहे, ती त्यांना आणि त्यांना जवळ करणाऱ्या भाजपला नरकात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, अशी जोरदार टीका काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
चोडणकर म्हणाले की माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली भाजपात गेलेल्या आठ काँग्रेस आमदारांनी जनतेचा व देवदेवतांचा विश्वासघात केलेला आहे. ” भाजपात प्रवेश करुन त्यांना पवित्र झाल्या सारख वाटले असेल, पण लोकशाहीची हत्त्या करणाऱ्या या विश्वासघातकी नेत्यांना लोक कदापी माफ करणार नाही. हे मागच्या पक्षांतरात सहभागी झालेल्यांना लोकांनी दाखवून दिले आहे. आज त्यांच्यावर घरी बसण्याची पाळी आली आहे,” असे चोडणकर म्हणाले.
आपण पक्षांतर करणार नाही अशी शपथ विधानसभा निवडणुकीपूर्वी या नेत्यांनी घेतली होती. यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी त्यांना मते दिली आणि जिंकून आणले. मात्र याच मतदारांचा अपमान या आमदारांनी आता पक्षांतर करुन केला आहे असे चोडणकर म्हणाले.
हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन या तिन्ही धर्मातील जागृत देवस्थानात नेऊन ही शपथ सर्वांना देण्यात आली. पण सत्तेच्या लोभापायी दैत्य बनलेल्या गद्दार आमदार देवालाही जुमानले नाही. म्हापशाच्या देव बोडगेश्वराची शपथ जे मोडतात , त्यांचे पुढे काय होते हे गोव्याने तीन राजकीय नेत्यांच्या बाबतीत अनुभवलेले आहे. ज्या पक्षाने मोठे केले त्याचा आणि मतदारांचा विश्वासघात करून भाजपात गेलेल्या या फुटिरांना गोव्यातील देव देवता आणि जागृत जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे ते पुढे म्हणाले.
चोडणकर म्हणाले की या प्रकारामुळे देवाला मानणारे लोक रोश व्यक्त करत असताना दिसत आहे आणि हा रोश असाच कायम राहणार आहे, कारण आम्ही आजपर्यंत देवाला सर्वोच्च मानले आहे. “कदाचित या आमदारांना सध्या भाजपच सर्वोच्च वाटत असेल,” असे ते पुढे म्हणाले.
भाजप ही पवित्र गंगा असून तिच्यात येणारा प्रत्येकजण पवित्र होतो, असे उद्गार काढणारे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची अवस्था भाजपने काय केली आहे, हे सारा गोवा जाणतो. आता भाजपरूपी या गंगेचे गटारगंगेत रूपांतर झाले असून त्याची दुर्गंधी असह्य झाली आहे. लोकशाही व्यवास्थेच्या गळ्याला नख लावणारी ही स्वार्थी पिलावळ गोव्याच्या राजकारणातून कायमची हद्दपार करण्याची जबाबदारी आता सुजाण गोमंतकीय जनतेवर येऊन पडली आहे. ती जबाबदारी ते भविष्यात पार पाडतील आणि गोव्यात निष्ठावान राजकीय नेत्यांची नव्याने फळी उभी करतील, असा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला.
मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर यांच्यावर रोश व्यक्त करताना चोडणकर म्हणाले की कॉंग्रेसने त्यांच्यावर विश्वास ठेवून तिसऱ्यांदा त्यांना तिकिट दिली होती आणि भाजपच्या उमेदवाराला पराभूत केले होते, तरीही त्यांनी कुणाचीच पर्वा न करता विश्वासघात केला.
” आमोणकर हे युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी आमची अपेक्षा होती. मात्र त्यांनी स्वार्थासाठी घेतलेला हा निर्णय अनुसरण करण्याचा योग्य नाही. लोकशाहीत असे योग्य नाही हे गोव्याची जनता पुढे दाखवून देईल,” असे ते म्हणाले.