Children film Festival :- मडगावच्या रवीन्द्र भवनात संपन्न होणाऱ्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाचा (Children film Festival) शुभारंभ नागराज मंजुळे यांच्या “नाळ -२” या मराठी चित्रपटाने होणार आहे. हा चित्रपट महोत्सव ९ ते १३ जानेवारी २०२४ असे पाच दिवस होणार असुन त्यात स्पर्धात्मक गटासाठी ३०, पॅनोरामा (स्पर्धात्मक नाही) गटात ४९ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
शिवाय या महोत्सवात कॅनडा, फ्रांस, दक्षिण कोरिया, बेल्जियम, नॉर्वे, हॉलंड, मंगोलिया, जर्मनी, कोलंबिया, स्विडन, झेक प्रजासत्ताक, अमेरिका, इराण, थायलंड, स्वित्झर्लंड या देशातील मुलांसाठीचे चित्रपट दाखविले जातील अशी माहिती चित्रपट महोत्सवाचे आयोजन समितीचे चेअरमन आमदार दिगंबर कामत यानी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवात एनिमेशन, कार्टुन, पर्यावरणीय, शैक्षणिक, समाजाला संदेश देणारे चित्रपट निवडण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेत माजी आमदार दामू नाईक, रवींद्र भवन मडगावचे अध्यक्ष राजेंद्र तालक, योगिराज कामत व अंतरंग प्रॉडक्शनचे बिपीन खेडेकर व सुद्धेश नाईक उपस्थित होते.
या महोत्सवाचे प्रमुख आश्रयदाते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत असून दामू नाईक हे उपाध्यक्ष आबेत. या बाल चित्रपट महोत्सवाला (Children film Festival) माहिती व प्रसिद्धी खात्याचे सहकार्य लाभलेले आहे.