कुंकळ्ळीतील प्रदूषण करणाऱ्या उद्योगांविरूद्ध युरींचा एल्गार
मडगाव :
विरोधी पक्षनेते व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदुषणकारी उद्योगांविरूद्ध एल्गार पुकारला असून, गोवा राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाला पत्र पाठवून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाची उच्च पातळी हा स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यासाठी मोठा धोका आहे. वारंवार तक्रारी केल्यानंतर तसेच वर्तमानपत्रे व समाजमाध्यमांवर प्रदुषण दाखवणाऱ्या बातम्या छापून आल्यानंतरही औद्योगिक वसाहतीतील आस्थापनांकडून होणाऱ्या जल आणि वायू प्रदूषणाकडे सरकारी प्राधिकरणांनी डोळेझाक केली आहे आणि प्रदूषक आस्थापनांना त्यांचे कारखाने चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे असे युरी आलेमाव यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.
गोवा पर्यावरण प्रभाव मूल्यमापन प्राधिकरण मी आज केलेल्या लेखी तक्रारीची गंभीर दखल घेईल व सर्व प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करेल अशी मी आशा बाळगतो. आता निर्वाणीचा इशारा दिल्यानंतरही जर सरकार कारवाई करणार नसेल तर लोकांना रस्त्यावर येणे भाग पडेल जेणेकरुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर राहिल असा इशारा विरोधी पक्षनेते आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी दिला आहे.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखाने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर प्राधिकरणांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नाहीत. त्यामुळे जल व वायू प्रदुषणाचे प्रमाण वाढले आहे. कुंकळ्ळी औद्योगीक वसाहतीत पर्यावरणीय मंजुरी तसेच कंसेट टू ऑपरेट परवान्याशिवाय अनेक कारखाने चालू आहेत अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.
गोवा पर्यावरण प्रभाव मूल्यमापन प्राधिकरणाला लिहिलेल्या पत्रात, कुंकळ्ळीच्या आमदाराने ऑरेंज फॉक्स स्टील प्रा. लि. हा कारखाना पर्यावरणीय मंजुरीशिवाय कार्यरत असल्याचे सांगून त्यामुळे राज्याच्या तिजोरीचे नुकसान होत असल्याचे नमूद केले आहे.
सदर औद्योगीक वसाहतीत सरकारने मंजुरी दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन करून फायदा जोडण्याचे प्रकार सर्रास चालत आहेत. सदर बेकायदेशीरपणांमूळे सरकारी तिजोरीला काहिच फायदा होत नसल्याचे युरी आलेमाव यांनी त्यांच्या पत्रात निदर्शनास आणले आहे.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील विविध फिश मिलमुळे होणाऱ्या प्रदूषणावरही युरी आलेमाव यांनी आपल्या पत्रातून प्रकाश टाकला आहे. मत्स्य गिरण्यांद्वारे उघड्यावर सोडण्यात येणाऱ्या घाण पाण्यामुळे लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. काही फिश मिल्स बोअरवेलमध्ये सांडपाणी टाकतात ज्यामुळे शेवटी भूजल प्रदूषित होते असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
पत्रात अधोरेखित केलेल्या मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेऊन प्रदूषण थांबवण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत आणि प्रदूषणास कारणीभूत असलेल्या औद्योगिक कारखान्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुंकळ्ळीच्या आमदाराने गोवा पर्यावरण प्रभाव मूल्यमापन प्राधिकरण सदस्य सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे.