राज्यात प्रथमच होत आहे ‘श्रीमती सन्मानोत्सव’
प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते होणार सत्कार
पणजी :
नोकरी-घर-संसार अशी दोलायमान कसरत करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाबद्दल घरच्यांकडून किंवा समाजाकडून क्वचितच कौतुकाचे दोन शब्द ऐकायला मिळत असतील. त्यामुळे प्रियोळ प्रगती मंचच्या वतीने अशाच सगळ्या महिलांचे गोडकौतुक करणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन ५ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि गोमंतकन्या वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते महिलांना ‘श्रीमती सन्मानोत्सव’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
प्रियोळ प्रागती मंचच्या वतीने विशेष आयोजित सदर उपक्रम बेतकी -खांडोळा येथील बिग बी सभागृहामध्ये रविवार, ५ जानेवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत होणार आहे. यावेळी राज्याचे कला आणि संस्कृती तथा क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री गोविंद गावडे यांची विशेष उपस्थित असणार असून, मान्यवरांच्या हस्ते ‘गोमंतक प्रतिभा पुरस्कार’ आणि ‘श्रीमती सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या समाजात महिलांनी कुटुंबासाठी घेतलेले कष्ट हे सर्वसामान्यतः दिसून येत नाही. पण घर-संसारासाठी महिलांनी केलेला त्याग हा खूपच मोठा असतो. अशावेळेला त्यांच्या कष्टाचे आठवण राखत, त्यांना उत्साह वाटेल, अशा शब्दात त्यांचे कौतुक केले तर, त्या महिलेचाही आत्मविश्वास नक्कीच वाढेल, आणि हीच बाब लक्षात घेऊन आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य महिलांना सन्मानित करण्याचे ठरवले आहे. श्रीमती सन्मानोत्सव हा त्याचाच एक महत्वाचा भाग आहे, असे संस्थेच्या उपक्रम प्रमुख रीना गावडे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला असून, राज्यातील अधिकाधिक महिलांनी यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने अध्यक्ष युगांक नायक आणि मुख्य समन्वयक रीना गावडे यांनी केले आहे.