4 वर्षांनंतर दोना पावला जेटी खुली….
Dona Paula Jetty Inauguration: आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असलेल्या दोना पावला जेटी नूतनीकरणासाठी गेल्या चार वर्षांपासून बंद होती. काम पूर्ण झाले. मात्र उद्घाटनाचा पत्ताच नव्हता. अखेर मुहूर्त ठरला पर्यटनमंत्र्यांच्या वाढदिनाचा. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह आमदार आणि इतर नेतेमंडळी हजर राहणार असे ठरले.
मात्र सकाळी 11 चा मुहूर्त टळल्यानंतर अनेकांनी काढता पाय घेतला. तरीही उद्घाटनाचा पत्ता नव्हता. अखेर दीड वाजता उद्घाटनाची औपचारिकता पार पडली. त्यामुळे या जेटीच्या नूतनीकरणाच्या लेखी विलंबच विलंब, अशी चर्चा कार्यक्रम स्थळी रंगली होती.
केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी कोस्टल सर्किट प्रकल्प अंतर्गत राज्य सरकारच्या पर्यटन खात्याच्या वतीने दोना पावला जेटीचे नूतनीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून ही जेटी खुली होण्याची प्रतीक्षा पर्यटक आणि स्थानिकांना होती.
या जेटीचे सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण होऊनही उद्घाटन होत नव्हते. अखेर आज पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते जेटी सार्वजनिक करण्यात आली. नव्याने उद्घाटन केलेल्या जेटीवर पर्यटन विभागाने लावलेल्या बोर्डमध्ये प्रौढांसाठी 50 रुपये आणि 10 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 25 रुपये शुल्क नमूद केले आहे.
नव्याने दुरुस्त आणि नूतनीकरण केलेल्या जेटीवर शुल्क आकारण्यात येणार आहे, मात्र हे शुल्क फक्त पर्यटकांसाठी लागू असेल आणि स्थानिकांना प्रवेश विनामूल्य असेल, असे पर्यटन मंत्री खंवटे यांनी जाहीर केले आहे.