गोविंद गावडेंनी दिला पुणेकर रसिकांना सुखद धक्का…
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘इथे ओशाळला मृत्यू’ या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरू होता. पहिल्या अंकात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला हाऊसफुल्ल प्रेक्षागृहाने दाद दिली होती.
नाटकाच्या मध्यंतरात गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांचा सत्कार नियोजित होता. त्यासाठी मान्यवर व्यासपीठावर आले आणि सत्कार स्वीकारण्यासाठी चक्क संभाजी महाराजांच्या वेशातील कलाकारच पुढे आला. एका राज्याचे मंत्रीच नाटकातील मध्यवर्ती भूमिका साकारत होते, हे कळताच नाट्यगृहातील प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
एखाद्या खात्याचा मंत्री त्याच क्षेत्राविषयी इतका जाणकार आहे आणि त्यात सक्रिय देखील आहे, हे पाहून पुण्यातील रसिकांना सुखद धक्का बसला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनीही गावडे यांच्या या भूमिकेचे कौतुक केले.
जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित या कार्यक्रमात गोव्याच्या श्री सिद्धीनंदन थिएटरने हे नाटक सादर केले. अवघ्या पंधरा दिवसांच्या तालमीवर त्यांनी हे नाटक सादर केले. मात्र, त्यांच्या व सर्वच कलाकारांच्या संवादफेक आणि अभिनयातील सफाईने प्रभावित झालेल्या रसिकांनी त्यांना दाद दिली.
गावडे यांच्याकडे सध्या गोव्याच्या राज्य मंत्रिमंडळात कला व सांस्कृतिक खात्यासह, क्रीडा खाते आणि ग्रामीण विकास संस्थेचाही कार्यभार आहे. 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपतर्फे प्रियोळ मतदारसंघातून निवडून आले आहेत.