
मडगाव :
पतंजली आयुर्वेदिकशी संगनमत केल्याबद्दल गोव्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या आयूष मंत्रालयाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. भाजपसाठी हे “तेफळांचे आजूत” ठरले आहे. ‘मोदी का परिवार’ घोटाळेबाज आणि फसवणूक करणाऱ्यांशी साटेलोटे करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा आरोप काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष दिव्या कुमार यांनी केला आहे.
पतंजली आयुर्वेदिकने प्रकाशित केलेल्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणावर प्रतिक्रिया देताना दिव्या कुमार यांनी भ्रष्टाचारी भाजप सरकारवर जाहिर टीका केली.
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, दिव्या कुमारने भाजप कार्यकर्ते आणि प्रचारक स्नेहा भागवत, शेफाली वैद्य, रूपेश कामत आणि गिरीराज पै वेर्णेकर यांना टॅग करून “कुछ तो बोलो” असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे.
सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव यांचा माफीनामा स्वीकारण्यास नकार दिला आणि “लिप सर्व्हिस” असे म्हटले आणि “भारतीयांची दिशाभूल केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे” अशी टिपण्णी केली आहे. पतंजलीने सर्व मर्यादा पार केल्या आहेत, असेही सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण केले, असे दिव्या कुमार यांनी नमूद केले.
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले, “ॲलोपॅथीमध्ये कोविडवर कोणताही उपाय नाही असा प्रचार करत पतंजली गावागावांत जात असताना केंद्र सरकारने डोळे मिटून का बसणे निवडले याचे आश्चर्य वाटते अशी विचारणा आज सर्वोच्च न्यायालयाला करावी लागली हे धक्कादायक आहे असे दिव्या कुमार यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची सामान्य लोकांप्रती बेफिकीर आणि असंवेदनशील वृत्ती समोर आली आहे. भाजपने गेल्या 10 वर्षांत पतंजली सारख्या उद्योगांना लोकांच्या जीवाशी खेळण्याची मूभा दिली आहे, असा आरोप दिव्या कुमार यांनी केला आहे.
गोमंतकीयांनी भाजपचे खरे रंग ओळखून आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवावा, असे आवाहन दिव्या कुमार यांनी शेवटी केले आहे.
…