
‘पीस लिली सँड कॅसल’ ची फ्रान्समधील ‘या’ सिने महोत्सवात निवड
पणजी :
‘पीस लिली सँड कॅसल’ या सहित स्टुडिओ निर्मित कोंकणी लघुपटाची नुकतीच फ्रान्समधील प्रतिष्ठित ‘टुलूज इंडियन सिने महोत्सवात’ अधिकृतपणे निवड झाली आहे. १८ एप्रिल पासून टुलूज- फ्रांस येथे होणार असलेल्या या सिने महोत्सवात हा लघुपट गोव्याचे प्रतिनिधित्व करणार असून, या महोत्सवाच्या माध्यमातून ‘पीस लिली सँड कॅसल’ चा आंतरराष्ट्रीय प्रीमिअर होत आहे.
22 मिनिटांच्या या कोंकणी लघुपटाला नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या इफ्फिमध्ये प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, हिमांशू सिंग दिग्दर्शित ‘कुपांचो दर्यो’ आणि ‘अर्दो दीस’ या दोन लघुपटांतील गोष्ट पुढे घेऊन जाणारा हा तिसरा लघुपट म्हणजेच लघुपटत्रयीतील हा तिसरा भाग आहे. या तिन्ही भागांना विविध सिनेमहोत्सवात प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. ‘पीस लिली सँड कॅसल’ मध्ये एकाच घरात वेगवेगळ्या काळात राहणाऱ्या दोन महिलां त्या घराबद्दलच्या आपल्या भावना एकमेकांकडे व्यक्त करताना दिसतात.
या लघुपटाच्या फ्रांसमध्ये झालेल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना या लघुपटाचे आणि सहित स्टुडिओचे निर्माते, किशोर अर्जुन यांनी सांगितले कि; या लघुपटाला नुकताच इंडो-फ्रेंच सिने महोत्सवात ‘महिला सबलीकरणा’वरील सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून देखील पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, त्यानंतर आता टुलूजसारख्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय सिने महोत्सवात ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’ची झालेली निवड हि आम्हा सगळ्यांसाठी तसेच कोंकणी सिनेकर्मीची उमेद वाढवणारी आहे. इथल्या मातीची गोष्ट इथल्या भाषेत सांगितली, तर ती अधिक तीव्रतेने सर्वत्र पोहोचते हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
या लघुपटाचे दिग्दर्शक हिमांशू म्हणाले की, कागदावरील कथानक पडद्यावर आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेल्या प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञाचे आम्ही ऋणी आहोत. २०२३ मध्ये गोव्यातून सुरु झालेल्या या लघुपटाचा आंतरराष्ट्रीय प्रवास सुरु झाला असून, गोव्याच्या मातीतील गोष्ट जगभरात नेताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
या लघुपटात दक्षा शिरोडकर, सोबीता कुडतकर, उगम जांबावलीकर हे गोव्यातील तरुण आणि नावाजलेले कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.