‘उमेदवार बघू नका, कमळाला मत म्हणजे…’
सोलन:
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्याचे आवाहन पंतप्रधानांकडून राज्यातील जनतेला केलं जात आहे. “कमळाच्या फुलाला दिलेलं प्रत्येक मत थेट माझ्या खात्यात आशीर्वाद म्हणून जाईल”, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. सोलन येथील सभेला संबोधित करताना हिमाचल प्रदेशातील जनतेशी वैयक्तीक आणि भावनिक नातं असल्याचं पंतप्रधान म्हणाले आहेत.
“भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण आहे हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्ही केवळ कमळाचं फुल लक्षात ठेवा. मी हे फुल घेऊन तुमच्याकडे आलो आहे. मतदान करताना कमळाचं फुल दिसल्यास भाजपा आहे हे समजून घ्या”, असं मोदींनी म्हटलं आहे. “दिल्ली प्रमाणेच या राज्यातही मोदींना मजबूत करायचं आहे का नाही?” असा सवालही पंतप्रधानांनी जनतेला यावेळी विचारला.
सोलनमधील सभेत पंतप्रधानांनी काँग्रेसवरही सडकून टीका केली. “हिमाचल प्रदेशमधील आधीच्या काँग्रेस सरकारने स्वार्थापायी राज्यात स्थैर्य नांदू दिले नाही. याच कारणासाठी लहान राज्यांमध्ये स्थिर सरकार काँग्रेसला नको आहे”, असा हल्लाबोल मोदींनी केला आहे. “काँग्रेस म्हणजे अस्थिरता, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजे स्वार्थ आणि काँग्रेस म्हणजे घराणेशाही” असं टीकास्र त्यांनी यावेळी डागलं. तीन दशकांच्या अस्थिरतेमुळे देशाची विकासात पीछेहाट झाल्याचा आरोपही मोदींनी केला आहे.