
उद्योगविश्वातील दिग्गज एअर इंडियासोबत उभे राहिले…
अहमदाबाद विमानतळाजवळ बोईंग ७८७-८ ड्रीमलायनरला झालेल्या महाभयंकर अपघातामध्ये २७५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर चोहोबाजूंनी टीकेचा भडीमार होऊ लागला पण उद्योगजगत आणि विमान वाहतूक क्षेत्रातील दिग्गज मात्र एअर इंडियाच्या पाठीशी उभे आहेत.
लंडन गॅटविकला जाण्यासाठी विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच ही दुर्घटना घडली, मात्र त्यामुळे टाटा समूहाच्या मालकीच्या या विमान कंपनीसाठी पुढे आलेल्या उद्योगविश्वाच्या एकतेचे अभूतपूर्व दर्शन घडले आहे.
भारताच्या एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरोचे माजी अनुभवी इन्वेस्टिगेटर कॅप्टन किशोर चिंता यांनी या घटनेच्या अपवादात्मक स्वरूपाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण संदर्भ दिला. कॅप्टन चिंता यांनी बीबीसीला सांगितले आहे की, ही दुर्घटना विमान वाहतूक क्षेत्रातील “दुर्मिळांतील दुर्मिळ” परिस्थिती दर्शवते. “माझ्या माहितीनुसार असे कधीच घडलेले नाही” असे त्यांनी जोर देऊन सांगितले.
आरपीजी ग्रुपचे बिझनेस लीडर हर्ष गोएंका यांनी एअर इंडियाने आपत्ती व्यवस्थापनामध्ये जो दृष्टिकोन समोर ठेवला आहे त्याला जोरदार पाठिंबा दिला आहे. द इकॉनॉमिक टाईम्समध्ये लिहिताना, श्री गोएंका यांनी याआधी उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थिती, विशेषतः २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी टाटा समूहाने दिलेल्या प्रतिसादाशी तुलना केली आहे.
श्री गोएंका यांनी लिहिले आहे की, “इथे टाटा समूहाचे वेगळेपण दिसून येते, त्यांनी जराही मुद्दा दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला नाही.” अशा काळात ठामपणे समोर उभे राहिलेले समूहाचे नेतृत्व आणि त्यांनी दिलेल्या प्रामाणिक प्रतिसादाचे कौतुक केले. त्यामुळे सर्वसामान्यतः कॉर्पोरेट संकटांमध्ये दडलेल्या अडचणी इथे टाळल्या गेल्या.
जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव कपूर यांनी एअर इंडियाच्या कामकाजावर निर्बंध घालण्याच्या आवाहनांना विरोध केला आहे. श्री कपूर यांनी टीकाकारांना दशकांपासून चालत आलेल्या या विमान कंपनीने आजवर बजावलेल्या मजबूत सुरक्षा कामगिरीची आठवण करून दिली आहे.
“एअर इंडियाने गेल्या काही दशकांपासून एक उत्तम सुरक्षितता रेकॉर्ड राखला आहे. एक दुर्घटना घडली आणि लोकांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला,” ही श्री कपूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म केलेली पोस्ट आहे.
एअर इंडियाने अधोरेखित केले आहे की, बोईंग ७८७ विमानाने एआय१७१ दुर्घटना होईपर्यंत कोणत्याही अपघाताशिवाय किंवा मृत्यूशिवाय जगभरात ५० लाखांहून अधिक उड्डाणे केली होती. “उड्डाण हा वाहतुकीचा सर्वात सुरक्षित प्रकार आहे,” श्री कपूर यांनी ठामपणे सांगितले आहे.
सीईओ कॅम्पबेल विल्सन आणि अध्यक्ष एन. चंद्रशेखरन दोघेही तातडीने अपघातस्थळी पोहोचले आणि एअर इंडियाने या संकटाला ताबडतोब प्रतिसाद दिला, त्यांच्या या वागण्याचे कौतुक उद्योगक्षेत्राने अशाप्रकारे केले आहे.
चंद्रशेखरन यांनी वचन दिले आहे की, ते त्यांच्या जबाबदारीपासून कधीही मागे हटणार नाहीत.” टाटा समूहाने प्रत्येक पीडिताच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.