पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीने (जीपीसीसी) संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाच्या नियुक्त्यांची घोषणा केली.
जीपीसीसीचे कार्याध्यक्ष एम. के. शेख यांनी हिमांशू तिवरेकर यांची गोवा प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या संयोजकपदी नियुक्ती केली आहे. तसेच ग्लेन काब्राल यांची कुंभारजुवे ब्लॉक काँग्रेस समितीच्या संयोजकपदी, तर सूर्यकांत गावडे यांची सांखळी ब्लॉक काँग्रेस समितीच्या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या संयोजकांवर संबंधित विभाग व समित्यांच्या संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्यातील पक्षसंघटना अधिक सक्षम करणे, जनसंपर्क वाढविणे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय भूमिका देणे, हा या नियुक्त्यांमागील उद्देश असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.


