
NEET पेपरफुटी प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ला पुण्यातून अटक
NEET UG 2026 Paper Leak: नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे. पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून रसायनशास्त्राच्या सेवानिवृत्त प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. पी. व्ही कुलकर्णी असे या सेवानिवृत्त प्राध्यापकाचे नाव असून, तो नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने परीक्षा प्रक्रियेत सहभागी होता आणि त्याच्याकडे प्रश्नपत्रिकाही उपलब्ध होत्या, अशी माहिती समोर आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तोच मास्टरमाईंड असल्याचे सीबीआयच्या तपासात आढळून आले आहे.
याबाबत इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने पी. व्ही. कुलकर्णी या सेवानिवृत्त प्राध्यापकाला पुण्यातून अटक केली आहे. पेपरफुटीचा तोच मास्टरमाईंड असल्याचे तपासात समोर आले आहे. कुलकर्णी एनटीएच्या वतीने परीक्षेच्या प्रक्रियेत सहभागी होता. त्याच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध होत्या एवढेच नव्हे तर एप्रिल २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील निवासस्थानी विशेष कोचिंग सत्रे आयोजित केली होती. या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना फुटलेल्या पेपरवरुनच शिकवणी देण्यात आली होती. दरम्यान, आता सीबीआयने प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या लोकांची यादी शिक्षण मंत्रालयाकडे मागितली आहे.
आणखी दोघांना अटक
सीबीआयने चौकशीनंतर प्राध्यापक कुलकर्णीला पुण्यात अटक करून दिल्लीला नेण्यात आले आहे. कुलकर्णीने घेतलेल्या विशेष कोचिंग क्लासमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कथितरित्या लाखो रुपये फी जमा केली होती. दरम्यान, सीबीआयने मनीषा वाघमारेसह आणखी एका व्यक्तीला पुण्यातून अटक केली आहे. “कुलकर्णीने वाघमारेच्या मदतीने विशेष कोचिंग क्लासेस आयोजित केले होते. या विशेष कोचिंग क्लासेसमध्ये तो फुटलेल्या पेपरमधील प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे सांगत असे,” असा आरोप केला जात आहे.
आतापर्यंत सात जणांना अटक
शिक्षण मंत्रालयाकडून लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीबीआयने १२ मे रोजी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. सीबीआयने तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करुन, देशातील विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. गेल्या २४ तासांत देशातील विविध ठिकाणी सीबीआयने धाडसत्र राबवत अनेक संशयास्पद कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबईल फोन जप्त केले. जयपूर, गुडगाव, नाशिक, पुणे आणि आहिल्यानगर अशा सात ठिकाणांवर संशयितांना अटक करण्यात आली आहे. सातही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, दोघांना ट्रान्झिट रिमांडवर चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात आले आहे, अशी असे वृत्त सीबीआयच्या हवाल्याने एक्सप्रेसने प्रसिद्ध केले आहे.
वाघमारे आणि लोखंडे यांना अटक
दरम्यान, ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणात पुण्यातील ब्यूटीपार्लर चालविणारी महिला मनीषा वाघमारे आणि अहिल्यानगर येथील धनंजय लोखंडे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. धनंजय लोखंडे (वय २६) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या संपर्कातील पुण्यातील लागेबांधे समोर आले होते. त्यानुसार, बिबवेवाडी परिसरात ब्यूटीपार्लर चालविणारी मनीषा वाघमारे आणि अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला पुणे पोलिसांनी बुधवारी (१३ मे) ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोघांनाही पुढील चौकशीसाठी सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले. तर, अभियांत्रिकी शाखेतील एका विद्यार्थ्याला चौकशीनंतर सोडून देण्यात आले आहे.



