
तमिळनाडूसाठी स्वतंत्र ध्वजाची मागणी; ‘तिरंग्याच्या बरोबरीचा ध्वज हवा’
विजय सरकारमधील मंत्र्याचे विधान
चेन्नई : तमिळनाडूसाठी स्वतंत्र राज्यध्वज तयार करण्याची मागणी राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या सरकारमधील क्रीडामंत्री आधव अर्जुन यांनी राष्ट्रीय ध्वजाच्या बरोबरीचा स्वतंत्र ध्वज असावा, अशी भूमिका मांडली आहे. त्यांच्या या विधानावर भाजपाने आक्षेप घेतला असून, अशा मागण्यांमुळे तमिळ आणि भारतीय अस्मितांमध्ये कृत्रिम संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असल्याची टीका केली आहे.
तमिळनाडू दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आधव अर्जुन यांनी राज्याचा स्वतंत्र ध्वज असण्याची गरज व्यक्त केली. देशातील अनेक राज्यांचे स्वतःचे ध्वज असल्याचा दाखला देत त्यांनी तमिळनाडूसाठीही स्वतंत्र ध्वज तयार करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी या ध्वजाचे सर्वप्रथम ध्वजारोहण करावे आणि राज्यातील प्रत्येक घरावरही हा ध्वज फडकवण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले.
“आता आपल्याला असा ध्वज तयार करण्याची गरज आहे, जो भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या बरोबरीचा असेल,” असे आधव अर्जुन म्हणाले. १८ जुलै रोजी साजरा होणारा तमिळनाडू दिन आणि १ नोव्हेंबर रोजी साजरा होणारा भाषावार प्रांतरचना दिन या दोन्ही दिवशी मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र ध्वज फडकवावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
भाजपाकडून मागणीला विरोध
आधव अर्जुन यांच्या विधानावर भाजपाचे नेते विनोज पी. सेल्वम यांनी समाजमाध्यमांवरून टीका केली. तमिळ भाषा, संस्कृती आणि अस्मिता यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी स्वतंत्र ध्वजाची आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटले.
“तमिळ भाषेला स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी वेगळ्या ध्वजाची गरज नाही. भारतीय तिरंग्याखाली तमिळ संस्कृती किंवा अस्मिता कधीही दुय्यम ठरत नाही. तमिळ आणि भारतीय या दोन्ही ओळखींचा आपल्याला अभिमान असायला हवा. मग समाजात कृत्रिम भेदभाव निर्माण करण्याची गरज काय?” असा सवाल सेल्वम यांनी उपस्थित केला.
राज्यातील तमिळ माध्यमांच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस योजना आखण्याऐवजी अशा राजकीय मुद्द्यांवर भर दिला जात असल्याची टीकाही भाजपाने केली.
करुणानिधींचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत
तमिळनाडूसाठी स्वतंत्र ध्वजाची मागणी नवी नाही. १९७० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या सरकारने स्वतंत्र राज्यध्वजाचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावित ध्वजाच्या रचनेत करड्या रंगाची पार्श्वभूमी, वरच्या डाव्या बाजूला भारतीय तिरंगा आणि मुख्य भागात राज्याचे मंदिराच्या गोपुराचे प्रतीक ठेवण्यात आले होते.
करुणानिधी यांनी हा प्रस्ताव तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर मांडला होता. मात्र, केंद्र सरकारकडून अपेक्षित मान्यता न मिळाल्याने हा प्रस्ताव प्रत्यक्षात येऊ शकला नाही.
दरम्यान, २०१८ मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, भारतीय राज्यघटनेत राज्यांना स्वतंत्र ध्वज देण्याची स्पष्ट तरतूद नाही. तसेच, भारतीय ध्वजसंहितेनुसार राष्ट्रीय ध्वजापेक्षा वर किंवा त्याच्या बरोबरीने त्याच ध्वजस्तंभावर अन्य ध्वज फडकवण्यास मनाई आहे.
त्यामुळे आधव अर्जुन यांच्या ताज्या विधानामुळे तमिळनाडूमधील प्रादेशिक अस्मिता, राज्यांचा स्वतंत्र ध्वज आणि राष्ट्रीय ध्वजाच्या स्थानासंबंधीची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.







