
ओमर अब्दुल्ला सरकारमध्ये नाराजी?; १९ आमदारांची चार तास गुप्त बैठक
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्समध्ये (एनसी) अंतर्गत नाराजीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पक्षातील नाराज १९ आमदारांनी श्रीनगरमध्ये तब्बल चार तास बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाची पुनर्रचना करावी, तसेच मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय असलेल्या काही पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांवरून हटवावे, अशी मागणी या आमदारांनी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वापुढे पक्षांतर्गत आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
श्रीनगरमध्ये शुक्रवारी (३० ऑक्टोबर) आमदार कैसर जमशेद लोन यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्येष्ठ आणि अनुभवी आमदारांना डावलण्यात आल्याने पक्षात नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांनी एकत्र येत पुढील रणनीतीवर चर्चा केली. या बैठकीत संयुक्त ठराव तयार करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
मंत्रिमंडळ फेररचनेची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या मंत्र्यांना बदलून नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी नाराज आमदारांनी केली आहे. मंत्रिपदांचे वाटप करताना ज्येष्ठता, कामगिरी आणि जम्मू तसेच काश्मीर विभागांमधील प्रादेशिक समतोल विचारात घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे. याशिवाय मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नासिर अस्लम वानी आणि खासदार शम्मी ओबेरॉय यांना पक्षातील आणि प्रशासकीय निर्णयप्रक्रियेतील हस्तक्षेपामुळे जबाबदाऱ्यांवरून हटवण्याची मागणीही करण्यात आल्याचे वृत्त आहे.
२७ ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीर सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यामध्ये अली मोहम्मद सागर, मीर सैफुल्ला, शमीम फिरदौस आणि अल्ताफ अहमद वानी यांचा समावेश करण्यात आला. मात्र, या विस्तारात अपेक्षित संधी न मिळाल्याने काही ज्येष्ठ आमदार नाराज झाले. मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यालाही पक्षातील काही आमदार अनुपस्थित होते.
फारुख अब्दुल्लांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न
पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनीही काही नाराज आमदारांशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. मात्र, पक्ष नेतृत्वाच्या प्रयत्नांना अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. दरम्यान, नाराज आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची भूमिका घेतल्याचेही सांगितले जात आहे.
या घडामोडींमुळे नॅशनल कॉन्फरन्समधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. पक्षातील नाराजी केवळ मंत्रिपदांच्या वाटपापुरती मर्यादित नसून निर्णयप्रक्रिया, नेतृत्वाची कार्यपद्धती आणि आमदारांना विश्वासात घेण्याच्या मुद्द्यांवरही असंतोष असल्याचे चित्र आहे. त्यामुळे फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला हे या नाराजीवर कसा तोडगा काढतात, याकडे जम्मू-काश्मीरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







