मणिपूरमध्ये ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं?
मागील काही दिवसांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये शेकडो लोकांचा जीव गेला आहे, तर हजारो कुटुंबं उद्धवस्त झाली आहेत. दरम्यान, बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. मणिपूरमध्ये ८०० ते १००० लोकांच्या जमावाने दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढली. एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडित महिलांना बाजुच्या शेतात घेऊन जात त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
खरं तर, मणिपूरमध्ये ३ मे २०२३ रोजी जातीय हिंसाचाराला सुरुवात झाली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ४ मे रोजी जमावाने या दोन पीडित महिलांना नग्न करत धिंड काढली. तसेच त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचाही आरोप आहे. त्याचदिवशी जमावाने २१ वर्षीय पीडित महिलेच्या १९ वर्षीय भावाची हत्या केली होती. एक कथित बनावट व्हिडीओ समोर आल्यानंतर संतप्त जमावाने हे घृणास्पद केलं आहे. याबाबतचं वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिलं आहे.
अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा मिळावा यावरून ३ मे रोजी मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायात हिंसाचार उफाळला. पहाडी प्रदेशात आदिवासी एकता रॅली काढल्यानंतर लगेचच हिंसाचाराला सुरुवात झाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पीडित महिला एका लहान गटाचा भाग होत्या. त्यांनी ४ मे रोजी स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी जंगल परिसराकडे पळ काढला होता. दरम्यान, हिंसाचार उफाळल्यानंतर दोन्ही समुदायकडून हल्ले-प्रतिहल्ले करण्यात आले.
यावेळी एका समुदायाच्या महिलांवर कथित बलात्कार झाल्याच्या अफवेनंतर जमावाने पीडित महिलांच्या गावावर हल्ला केला. तसेच त्यांनी जंगलात सुरक्षेसाठी गेलेल्या लोकांचा पाठलाग केला. या गटात दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता. यातील तिघे एकाच कुटुंबातील होते. ज्यामध्ये एक ५६ वर्षीय व्यक्ती, त्यांचा १९ वर्षांचा मुलगा आणि २१ वर्षांची मुलगी होती. तर त्यांच्यासोबत आणखी ४२ वर्षीय आणि ५२ वर्षीय अशा दोन महिला होत्या.
एफआयआरनुसार, हा गट जंगलाच्या दिशेनं जात असताना नॉन्गपोक सेकमाई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलीस या गटाला घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेनं जात असताना सुमारे ८०० ते १००० जणांच्या जमावाने त्यांना आडवलं. त्यानंतर संतप्त जमावाने या गटाला पोलिसांच्या ताब्यातून हिसकावून घेतलं. यावेळी १९ वर्षीय भावाने आपल्या २१ वर्षीय बहिणीला जमावाच्या तावडीतून वाचण्याचा प्रयत्न केला. पण जमावाने १९ वर्षीय भावाची जागीच हत्या केली. यानंतर जमावाने पीडित महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढली.
महिलांच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी १८ मे रोजी एफआयआर दाखल केला होता. पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.