google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
लेख

मणिपूरच्या ‘त्या’ महिलांसाठी बोला…

– ​रवि​श कुमार

सर्व भारतीय प्रेक्षक आणि वाचक,
शक्य आहे की आपल्यापैकी अनेकांनी मणिपूरचा तो व्हिडीओ पाहिला नसेल,ज्यात खूप सारे पुरुष काही महिलांना नग्न करून तिचं शरीर दाबत आहेत. पुरुषांचा जमाव निर्वस्त्र केलेल्या महिलांना पकडून घेऊन जात आहे. जमावाचे खुनी हात त्या महिलांच्या शरीरासोबत खेळत आहेत. असहाय्य आणि लाचार महिला रडताहेत. पुरुषांची गर्दी आनंद घेत आहे.

सभ्यतेच्या सामाजिक नियमांनुसार सोशल मीडिया साईट्स लवकरच या व्हिडीओचे प्रदर्शन थांबवतील. परंतु घडलेली घटना वास्तव आहे. घटनेचे तपशील तेच आहेत जे लिहिले आहेत.आपल्याला माहीत नाही की या व्हिडीओ नंतर त्या महिलांच्या सोबत काय झालं? जमावाची गर्दी त्यांना कुठून घेऊन येत होती? कुठे घेऊन जात होती? त्या व्हिडीओला सुरवात आणि शेवट नाहीये,फक्त मधला थोडा भाग आहे. कोणीही त्या व्हिडीओ कडे दुर्लक्ष करू शकत नाही. आज तुम्ही शांत राहू शकत नाही.

पुरुषांच्या जमावाने वेढलेल्या त्या निर्वस्त्र महिलांसाठी आज बोलावं लागेल. तुम्ही जिथे कुठेही असाल,बोला. बाजारात गेलात तर तिथे दुकानदाराशी बोला. रिक्षावाल्याशी बोला. ओला उबर कॅबच्या ड्रायव्हरशी बोला. वडिलांना फोन केला तर त्यांना सगळ्यात आधी हे सांगा. प्रेयसीचा फोन आला तर सगळ्यात आधी हे सांगा. वर्गात असाल तर उभं राहून तुमच्या शिक्षकांशी बोला. कोणत्या रेस्टॉरंट मध्ये मित्र मैत्रिणींसोबत मस्ती करत असाल तर खाणं थांबवून या महिलांसाठी बोला. बसमध्ये असाल, रेल्वेत असाल,विमानतळावर असाल तर तिथे सांगा की मणिपूर मध्ये असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात जमाव महिलांना निर्वस्त्र करून त्यांच्या शरीराशी खेळत आहे. ही घटना अशा देशात घडली आहे जिथे ‘आमच्या इथे महिलांना देवी समान वागणूक देऊन तिची पूजा केली जाते.’  हे खोटं वारंवार पसरवलं जातं.
manipur ravish kumar
आज जर या जमावाच्या विरोधात तुम्ही बोलला नाहीत तर त्या महिलांचं शरीर आणि मन नेहमी करता नागडं होईल. तुमचं न बोलणं, याचा अर्थ तुम्ही त्या गर्दीत सामील होणं आहे. तुमचं बोलण्याने तुम्ही महिलांना नग्न करून त्यांच्या शरीराशी खेळणाऱ्या पशूंच्या जमावात सामील होता. म्हणून फोन उचला, लिहा, सर्वाना सांगा की मणिपूरच्या महिलांच्या सोबत असं झालं. आम्ही याचा विरोध करतो.आमची मान शरमेने खाली जाते. मणिपूर मधील घटनेच्या विरोधात बोला.कोणी ऐकत नसेल तर बंद खोलीत त्या महिलांसाठी एकट्याने रडून घ्या.

मला माहितीये की मणिपूर मधील त्या महिलांची असहाय्यता आणि लाचारी तुमच्या पर्यंत पोहचणार नाही, कारण तुम्ही त्यांची हाक ऐकण्याच्या लायक राहिलेले नाही आहात. तुम्ही जे वर्तमानपत्र वाचता,जे चॅनेल पाहता, त्यांनी तुमची संवेदनशीलता मारून टाकली आहे. तुमच्या आतला चांगुलपणा त्यांनी संपवून टाकला आहे.

गोदी मीडिया मध्ये त्या महिलांचा आवाज उठेल की नाही मला माहित नाही. मला नाही माहीत की हे दृश्य पाहून आपले पंतप्रधान विव्हळ होऊन रडतील किंवा नाही? मला नाही माहीत की महिला विकास मंत्री स्मृती इराणी दिखाव्यासाठी तरी का होईना पण रडतील किंवा नाही? पण मला हे माहीत आहे की हा जमाव कोणी बनवला आहे. कोणत्या प्रकारच्या राजकारणाने बनवला आहे. या राजकारणाने तुम्हाला पशु बनवलं आहे.गोदी मीडिया ने त्यांच्या प्रेक्षक आणि वाचकांना माणूसघाणं बनवलं आहे.

जात,धर्म,भाषा,प्रदेशाच्या अस्मितेच्या राजकारणाने माणसालाच माणुसघानं बनवलं आहे. मणिपूरच्या महिलांना घेरून नाचणारा पुरुषांचा जमाव तुमच्या आजूबाजूला सुद्धा तयार झाला आहे. सोसायटीतील काका लोकांपासून सावधान रहा. आपल्या घरात दिवस रात्र विष पेरणाऱ्या नातेवाईकांपासून सावधान रहा. त्या सर्वांना जाऊन सांगा की की अस्मिता आणि द्वेषाच्या राजकारणाने देशाच्या जनतेला कशाप्रकारे या जमावात सामील केलं आहे. त्या ‘मणिपूर’च्या महिला नाहीयेत.त्या कुकी महिला नाहीयेत. त्या फक्त महिला आहेत. जर ही घटना तुम्हाला अस्वस्थ करत नसेल,याने तुमचं शरीर कंप पावत नसेल तर तुम्ही स्वतःला मृत घोषित करून टाका.

पण शेवटचा श्वास घेण्यापूर्वी त्या महिलांसाठी बोलून टाका. लिहून टाका. कोणाला तरी सांगा की असं झालं आहे. या देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूर मध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यात शांततेचे आवाहन केलेलं नाही. तिथे जाऊन द्वेष आणि हिंसा रोखण्याचे आवाहन केलेलं नाही. सरकारने त्याचं कर्तव्य पार पाडलं नाही. त्यांच्या जाण्याने किंवा आवाहनाने हिंसा थांबलीच असती याची काही गॅरंटी नाही. पण या चुप्पीचा काय अर्थ आहे? या चुप्पीचं समर्थन केलं जाऊ शकतं?
पंतप्रधानांची चुप्पी असू द्या.
तुम्ही तुमची चुप्पी तोडा.
बोला.

तुमचा,
रवि​श कुमार.

मराठी भाषांतर : कृतार्थ शेवगावकर
(साभार )

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!