
रोबोटिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञान अवगत करणे काळाची गरज
वैद्यकीय क्षेत्रात आरोग्यसेवेचा दर्जा सर्व स्तरांतून सुधरवा, ही मागणी सातत्याने वाढू लागली आहे. उत्तम दर्ज्याची रुग्णसेवा देताना आता अत्याधुनिक सर्जिकल तंत्रज्ञानाचा वापर होणेही आवश्यक ठरते. रोबोच्या मदतीने शस्त्रक्रिया पार पाडणे आता शक्यप्राय झाले आहे. या प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वोत्कृष्ट रुग्णसेवा पुरवता येते. रोबोटिक शस्त्रक्रिया उपलब्ध झाल्यास गोवा हे राज्य जागतिक पातळीवरील वैद्यकीय पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास येईल.
देशात रोबोटिक शस्त्रक्रियांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. देशभरातील विविध रुग्णालयांत ८५० सर्जन्स यांनी रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी आवश्यक प्रशिक्षण घेतले आहे. बऱ्याच रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या तब्बल १७० दा विंची रोबोटिक प्रणालीचा वापर सुरु केला आहे. देशभरात ही सुधारणा दिसून येत असताना, टायर २ शहरांतील वर्गवारीत मोडणाऱ्या गोवा येथे आरोग्यसेवेचा दर्जा उंचावणे आव्हानात्मक असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. गोव्यासारख्या इतर टायर २ वर्गवारीतील शहरांमध्येही ही अत्याधुनिक आरोग्यसेवा पोहोचविणे कठीणच असल्याचे तज्ज्ञांच्या वतीने सांगण्यात आले.

ग्लेनेग्लेस रुग्णालयातील जनरल सर्जरी आणि मिनिमल अक्सेस सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. जिग्नेश गांधी यांनी या विषयावर आपले मत मांडले. गोवा येथे रोबोटिक शस्त्रक्रियेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कितपत गरज आहे, यावर त्यांनी सर्वांसमोर आपली भूमिका जाहीर मांडली. ते म्हणाले, ‘‘रोबोटिक शस्त्रक्रियेची मदत घेतल्यास मूळ शस्त्रक्रियेत फायदा होतो. यात तंत्रज्ञानातून दिसणारी प्रतिमा फार उत्तम दर्ज्याची असते, शिवाय संपूर्ण प्रक्रियेवरचे नियंत्रण राखणे सोपे होते. साधी शस्त्रक्रिया असो वा किडनीसंबंधीची असो, आता गायनोकॉलॉजी संबंधित ते कर्करोगाच्या शस्त्रक्रियेत रोबोटिक शस्त्रक्रियेचा वापर केला जातोय. शस्त्रक्रियेत अचूकता साधणे शक्य होत असल्याने रुग्ण पटकन बरे होतात. त्यांचा रुग्णालयातील थांबण्याचा काळ कमी राहतो. परिणामी, रुग्णसेवेचा दर्जा उंचावणेही शक्य होते. ’’
गोवा राज्याची आकर्षक वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून ओळख बनवायची असेल, तर तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक राहील. गोव्यात रुग्णालयातील अत्याधुनिक सर्जिकल संसाधनांचा वापर केल्यास येथे जगभरातील रुग्णांचा वेढा वाढू शकतो. यावर बोलताना डॉ. गांधी म्हणाले, ‘‘शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरे होण्याचा काळ कमी करण्यास रोबोटिक शस्त्रक्रिया मदत करते. त्यामुळे गोव्यात वैद्यकीय पर्यटनाचा विकास होण्यासाठी रुग्णालयांत रोबोटिक शस्त्रक्रियांचा अवलंब होणे गरजेचे आहे. रुग्ण प्रगत तंत्रज्ञानाची सुविधा असलेल्या रुग्णालयांनाच प्राधान्य देतात. स्थानिक अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी, तसेच आरोग्यसेवा क्षेत्र मजबूत करण्यासाठी गोव्यातील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी रुग्णांची मागणी ध्यानात घ्यायला हवी.’’
यूएस आधारित इंट्युटिव्हच्या मोबाइल रोबोटिक सहायक शस्त्रक्रिया संवेदनशीलता केंद्रातील इलेव्हेन एक्सपिरियन्स केंद्रात बोलताना डॉ. गांधी यांनी आपले विचार मांडले. आरोग्यसेवेत योगदान देणाऱ्या व्यावसायिकांना, तसेच सर्वसामान्यांना रोबोटिक सहाय्यित शस्त्रक्रिया, त्याची वैशिष्ट्ये आणि क्लिनिकल प्रयोगांबद्दल माहिती देणे हे या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या केंद्रात इंट्युटिव्हच्या नव्या अकराव्या दा व्हिंची तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, शिवाय या केंद्रात नवनव्या सोईसुविधाही उपलब्ध आहेत. या केंद्रात रोबोटिक शस्त्रक्रियेतील प्रक्रियेतील आवश्यक सर्व बाबी पाहायला मिळतील. शस्त्रक्रियेतील नेमकी वेळ दर्शविणारा दृष्यरुपी सहायक, शस्त्रक्रियेत वापरले जाणारे ड्युअल ग्रिप तंत्रज्ञान आदी घटक या केंद्रात सर्वांना पाहायला मिळतील. या केंद्रातून दा व्हिंची रोबोटचा वापर अवगत असलेले प्रशिक्षणार्थी सर्जन्स आणि आरोग्यसेवा पुरविणारे कर्मचारी आता देशभरातील विविध आरोग्य केॱॱत कार्यरत आहेत. रोबोटिक शस्त्रक्रियेची देशभरात मागणी वाढतच असल्याने या केंद्रातून प्रशिक्षित होणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना रोबोटिक साहाय्याने केलेल्या शस्त्रक्रियेचे संपूर्ण ज्ञान पुरविले गेले आहे.
रोबोटिक शस्त्रक्रियेविषयी आरोग्यसेवेतील योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांसह रुग्णांनाही माहिती देणे आवश्यक असल्याचा मुद्दा डॉ. गांधी यांनी चर्चेदरम्यान मांडला. ‘‘रोबोटिक शस्त्रक्रिया म्हटली की, अनेकांना ही शस्त्रक्रिया माणसांऐवजी रोबोटच करत असल्याचा समज आहे. प्रत्यक्षात या शस्त्रक्रियांचे संपूर्ण नियंत्रण संबंधित सर्जनच्या देखरेखीखाली असते. शस्त्रक्रिया अचूक आणि नेमकी होण्यासाठी रोबोट सर्जन्सला मदत करतो. यामुळे सर्जन्सला शस्त्रक्रियेदरम्यान आपले कौशल्य योग्यरीत्या वापरता येते. रुग्णाला आरामदायी आणि सुरक्षित राहता यावे, अशा पद्धतीची रचना या तंत्रज्ञानात वापरली गेली आहे,’’ असेही डॉ. गांधी म्हणाले.
देशभरातील खासगी, तसेच सार्वजनिक वैद्यकीय क्षेत्रात आता रोबोटिक तंत्रज्ञानाचा सर्रास वापर होत असून, कानाकोपऱ्यात आरोग्यसेवचा दर्जा उंचावण्यासाठी धडपड दिसून येत आहे. वाढत्या जनजागृतीमुळे लहान शहरांतही आता या प्रगत तंत्रज्ञानाला मोठी मागणी आहे. डॉ. गांधी यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘आता गोव्यातील विविध रुग्णालयांनी रोबोटिक शस्त्रक्रिया सुरु करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आपल्या रुग्णालयांत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असायला हव्यात, याकडे त्यांनी लक्ष पुरविले आहे. तरीही या भागांत अत्याधुनिक शस्त्रक्रियांबद्दल जनजागृती होणे बाकी आहे, तसेच येथील रुग्णालयांत दा व्हिंचीसारख्या प्रणालींबाबत ज्ञान अवगत होणेही गरजेचे आहे.’’
प्रगत तंत्रज्ञानाचे अवलोकन केल्याने केवळ गोव्याच्या आरोग्यसेवेतच सुधारणा होणार नाही, तर रुग्णांना प्रगत वैद्यकीय सुविधा देणारे शहर म्हणूनही गोव्याचा नावलौकिक निर्माण होईल. गोव्यात जागतिक दर्ज्याच्या सोईसुविधांच्या उपलब्धतेमुळे हे शहर लवकरच जागतिक दर्ज्याचे वैद्यकीय पर्यटन बाजारपेठ म्हणून उदयास येईल.