
पीएसी आणि पीयूसीवर कारवाई करण्याची सभापतींकडे मागणी
पणजी :
युनायटेड गोवन्स फाऊंडेशनच्या कार्यकारी समितीचे सदस्य डॉमनिक नोरोन्हा यांनी आज विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांना निवेदन सादर करून पीएसी (पब्लिक अकाउंट्स कमिटी), पीयूसी (सार्वजनिक उपक्रम समिती) यांच्यावर अकार्यक्षमता आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली.
विधानसभेच्या अध्यक्षांना सादर केलेल्या निवेदनात, युनायटेड गोवन्स फाऊंडेशनने प्रत्येकास दिलेल्या जबाबदाऱ्यांच्या संदर्भात, सभापतींनी नियुक्त केलेल्या सर्व सभागृह समित्यांनी केलेल्या कामांचे लेखापरीक्षण करण्याचे आणि अकार्यक्षमतेसाठी योग्य कारवाई करण्याचे मागणी केली आहे.
पीएसी आणि पीयूसी समितीच्या अध्यक्षांवर नियुक्तीचा कार्यकाळ संपल्यामुळे कायदेशीर अधिकाराशिवाय सरकारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याबद्दल तसेच अशा समित्यांच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
युनायटेड गोवन्स फाऊंडेशनने निवेदनात असेही लिहिले आहे की पीएसीचे अध्यक्ष एल्टन डिकोस्टा यांनी त्यांच्या 24 महिन्यांच्या कार्यकाळातील 19 महिन्यांत कोणतीही बैठक घेतली नाही. पीयूसीचे अध्यक्ष युरी आलेमाव यांनी 15 महिन्यांत कोणतीही बैठक घेतली नाही.
27 जानेवारी 2025 रोजी झालेल्या पीएसी आणि पीयूसी बैठका बेकायदेशीर असल्याचं युनायटेड गोवन्स फाऊंडेशनच्या मेमोरँडममध्ये ठळकपणे नमूद करण्यात आलं आहे कारण दोन्ही समित्यांची मुदत डिसेंबर 2024 मध्ये संपली आहे.