
पर्यटनमंत्र्यांच्या शॅक्सबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेसचा आक्षेप
म्हापसा, 3 जून:
समुद्रकिनाऱ्यावरील ३० टक्के शॅक स्थानिकांनी ‘दिल्लीवाल्यांना’ सबलॅट केल्याच्या पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांच्या आरोपावर तीव्र आक्षेप घेत काँग्रेसने शनिवारी या ’ दिल्लीवाल्यां’चीं नावे सार्वजनिक करावी अशी मागणी केली. तसेच जर सरकारी मालमत्ता भाडेतत्त्वावर दिली असल्यास त्याचीही माहिती द्यावी असे या पक्षाने म्हटले आहे.
काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी शनिवारी म्हापसा येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले आणि सांगितले की, सरकारने आधी किती ‘बिगर गोमंतकियांना’ सरकारी मालमत्ता दीर्घ भाडेतत्त्वावर दिल्या आहेत हे सांगावे.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव विजय भिके, जनार्दन भंडारी, विकास प्रभू देसाई, सांताक्रुझचे गट अध्यक्ष जॉन नाझरेथ आणि कळंगुट गटाध्यक्ष लॉरेन्स सिल्वेरा उपस्थित होते.
गोम्स म्हणाले की, महसूल वसुलीसाठी पर्यटन हे सर्वोत्तम साधन आहे, मात्र तिथे सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
“गोव्यात 340 शॅक्स आहेत. मात्र खवंटे याच्या नुसार 102 शॅक बाहेरील लोकांना सबलेट केले आहेत, असे असल्यास त्यांनी त्यांची नावे सांगावी,” असे गोम्स म्हणाले.
“त्यांची नावे सार्वजनिक करा. ही प्रक्रिया पारदर्शक असायला पाहिजे. त्यात कार्यवाही करण्याचे अधिकार मंत्र्यांकडे आहेत. त्यांनी त्याचा वापर करावा आणि सांगावे की या 30 टक्के शॅक्स कोणी ताब्यात घेतल्या आहेत,” असे गोम्स म्हणाले.
गोम्स म्हणाले की, दिवंगत डॉ. विल्फ्रेड डिसूझा यांनी पर्यटन मंत्री असताना पर्यटन क्षेत्रात दूरदृष्टी ठेवून पर्यटनाच्या वापरासाठी जमिनी संपादित केल्या होत्या.
“किनारपट्टी भागात पर्यटन खात्याच्या जमिनी आहेत. आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की या जमिनी सरकारने कोणाला भाडेतत्त्वावर दिल्या आहेत, ” असे गोम्स म्हणाले.
ते म्हणाले की, अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात सरकारने त्यांची मालमत्ता लीजवर दिली आहे.
भाजप सरकार शॅक मालकांना त्रास देत असल्याची टीकाही विजय भिके यांनी केली.