आणिबाणीच्या पोस्टवरुन काँग्रेसने ‘काय’ केला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांवर पलटवार?
मडगाव :
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट, अकार्यक्षम, असंवेदनशील भाजप सरकारने गोव्याला दिवाळखोरीत ढकलून आर्थिक आणीबाणी लादली आहे. इंधन, भाजीपाला आणि कडधान्याच्या किमती वाढल्याने प्रत्येक घरांचे बजेट कोलमडले आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महिला त्रस्त आहेत, असा सणसणीत टोला महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक यांनी हाणला आहे.
1975 मध्ये काँग्रेसच्या राजवटीत जाहिर झालेल्या आणीबाणीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस महिला अध्यक्ष बीना नाईक यांनी भाजप सरकारवर सामान्य लोकांप्रती आणि विशेषत: महिलांबाबत असंवेदनशीलतेचा आरोप केला.
डॉ. प्रमोद सावंत यांची खुर्ची देवाचा विश्वासघात करणाऱ्या आणि गोमंतकीयांची फसवणूक करणाऱ्या घातकी आणि पातकी विश्वासघातक्यांच्या आधारावर टिकून आहे. डॉ. प्रमोद सावंतांनी भारतीय राज्यघटनेची हत्या केली आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची बळकावण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सुरू केलेल्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पक्षांतरांना प्रोत्साहन दिले, असा आरोप काँग्रेस सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष दिव्या कुमार यांनी केला.
आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी धडपडणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांप्रती भाजप सरकारने पूर्ण असंवेदनशीलता दाखवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नेहमीच श्रीमंत समर्थक आणि गरीब विरोधी धोरण राबविले आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज प्रत्येक गृहिणी महिलेला आर्थिक आणीबाणीचा सामना करावा लागत आहे, असा दावा बीना नाईक यांनी केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशिक्षितांसारखे वागणे थांबवावे आणि सोशल मीडियावर असंबद्ध मजकूर पोस्ट करणे बंद करावे. सतत वायफळ बोलून आणि खोट्या तारखा देवून त्या पाळण्यास असमर्थ ठरलेले डॉ. प्रमोद सावंत आज हसण्याचा विषय बनले आहेत. त्यांनी इतिहासाची पुस्तके वाचणे आणि स्वतःला शिक्षित करणे आवश्यक आहे, असा टोला काँग्रेसचे समाजमाध्यम विभाग अध्यक्ष दिव्या कुमार यांनी हाणला आहे.
गोव्यात रस्त्यांच्या वाईट पायाभूत सुविधांमुळे अपघात सुरक्षा आणीबाणी आहे. गोव्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या परिस्थितीमुळे जीवन सुरक्षा आणीबाणी आहे. गोव्यातील जनतेला आता भ्रष्ट भाजप सरकारला सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी आणीबाणी आहे, असे दिव्या कुमार म्हणाले.