‘कोंकणी ‘अनिवार्य’ करून जाहिरात पुनर्प्रकाशित करा’
पणजी:
आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी अल्तिनो येथील साबांखा कामगार पुरवठा सोसायटीच्या कार्यालयात निषेधार्थ निवेदन सादर केले. कोंकणीचे ज्ञान “अनिवार्य” असल्याचे नमूद करून, नवीन पदांसाठी सुधारित जाहिरात प्रकाशित करण्याची मागणी केली.
सोसायटीने शुक्रवारी नवीन पदांची जाहिरात केली होती, ज्यात कोंकणी “अनिवार्य” ऐवजी “इष्ट” असल्याचे म्हटले होते. गोव्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यासाठी कोंकणी भाषेचे ज्ञान सर्व सरकारी पदांसाठी “अनिवार्य” मानले जावे, असे आप ने निवेदनात म्हटले आहे.
‘आप’चे उपाध्यक्ष अॅड. सुरेल तिळवे यांच्या नेतृत्वाखाली आपचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आप राष्ट्रीय युवा शाखेच्या उपाध्यक्ष सेसिल रॉड्रिग्स, आपचे नेते सुनील शिंगणापूरकर आणि सरफराज शेख यांनी सोसायटीच्या व्यवस्थापकांकडे सोमवारपर्यंत सदर दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
सोसायटीने कुशल आणि अकुशल कामगारांसाठी एकूण ३८ पदांची जाहिरात दिली होती. जवळच्या आणि ओळखीच्या व्यक्तींना या पदांवर भरण्याच्या हेतूने विभागाकडून असे फेरबदल केले जात असल्यामुळे अनेक गोमंतकीयांना सरकारी नोकऱ्या मिळत नसल्याचा आरोप तिळवे यांनी यावेळी केला.
या संदर्भात आपचे शिष्टमंडळ राजभाषा संचालनालयालाही भेट देणार असल्याचे तिळवे यांनी सांगितले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे राजभाषा संचालनालयाची जबाबदारी आहे. तरी त्यांनी कोंकणी भाषेच्या संवर्धनासाठी काहीही केलेले नाही. कोंकणीचे ज्ञान “अनिवार्य” ऐवजी “इष्ट” आहे, असे त्यांच्या जाहिरातींमध्ये नमूद करून सरकारी संस्था तीच चूक सातत्याने करतात, असे तिळवे म्हणाले.