गोव्यात मॉन्सून दाखल…
पणजी:
केरळात आठ दिवस उशिरा दाखल झालेला नैऋत्य मान्सून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ मुळे सर्वांचेच अंदाज चुकवत अवघ्या तीन दिवसांत राज्यात दाखल झाला आहे. नैऋत्य मॉन्सूनने आता दक्षिण महाराष्ट्र व्यापत रत्नागिरीपर्यंत मजल मारली आहे.
दुसरीकडे, अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ अधिक गतिमान झाले असून ते गुजरातच्या कच्छ भागाला आणि पाकिस्तानतील कराची किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
तसा सतर्कतेचा इशारा गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीला देण्यात आला आहे. दरम्यान, कालपासून राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नैऋत्य मॉन्सून सर्वसाधारणपणे 1 जूनपर्यंत केरळ किनारपट्टीमध्ये दाखल होतो आणि तो टप्प्याटप्प्याने पुढे सरकत संपूर्ण देश व्यापतो. अलीकडच्या काही काळांमध्ये पाऊस उशिरा दाखल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुढील 48 तासांत आणखी सक्रिय होवून मॉन्सून बंगाल उपसागर, ईशान्येकडील राज्यांचा उर्वरित भाग आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आणि बिहारचा काही भाग व्यापणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.