गोवा विद्यापीठाने नुकताच मंगळुरु येथील जागतिक कोकणी केंद्राशी सामंजस्य करार केला आहे. शैक्षणिक आणि संशोधन सहयोगासाठी हा करार असून तो पाच वर्षे लागू असेल. करारानुसार प्राध्यापक, संशोधक, विद्वान यांची देवाणघेवाण होईल.
गोवा विद्यापीठ आणि केंद्रातील विद्यार्थी यांच्यासाठी ऑनलाइन व्याख्यान मालिका, संसाधन सामग्री आणि संशोधन विकसित करणे, डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यासारखे उपक्रम राबविले जातील. जागतिक कोकणी केंद्राद्वारे ‘कोकणी भाषा, संस्कृती आणि लोकांचे रक्षण’ हे उपक्रम राबविले जातात.
मंगळुरूचे केंद्र नियमितपणे गोवा विद्यापीठातील कोकणी विभागाशी सल्लामसलत करीत असते. विद्यापीठ आणि केंद्र एकत्रितपणे सांस्कृतिक आणि लोकोपयोगी कार्यक्रमही आयोजिले जाणार आहेत. सामंजस्य करारांतर्गत, दोन्ही संस्था आता संयुक्त संशोधन आणि प्रशिक्षण हाती घेणार आहेत.
1995 मध्ये पहिल्या जागतिक कोकणी अधिवेशनात मंजूर झालेल्या अंतिम ठरावानुसार जागतिक कोकणी केंद्राची स्थापना करण्यात आली. त्याच्या स्थापनेपासून, जागतिक कोकणी केंद्र देशभरातील कोकणी भाषिक समुदायांशी संलग्न आहे.