‘रामसेतू’बद्दल खात्रीने काहीच सांगता येणार नाही : केंद्र सरकार
गेल्या काही दिवसांपासून राम सेतुवरून (ram setu) राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषत: अक्षय कुमारच्या राम सेतू चित्रपटानंतर यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. रामायणात सांगितल्याप्रमाणे भगवान राम यांनी सीतेची सोडवणूक करण्यासाठी भारतातून श्रीलंकेला जाण्यासाठी हा पूल बांधला होता. तामिळनाडूच्या किनारपट्टीपासून थेट श्रीलंकेला जोडणारा हा पूल होता, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, हा पूल खरंच अस्तित्वात होता की ही फक्त एक दंतकथा आहे, यावरून सगळी चर्चा सुरू असताना संसदेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात यासंदर्भात मोठं विधान केलं आहे.
हरियाणातील भाजपा खासदार कार्तिकेय शर्मा यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. भारताच्या इतिहासातील गोष्टींची वैज्ञानिकदृष्ट्या चाचणी केली जाणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी राम सेतुचाही उल्लेख केला होता. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी उत्तरादाखल केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या कामाविषयी माहिती दिली. तसेच, आत्तापर्यंत समुद्रातल्या ज्या अवशेषांना राम सेतू म्हटलं जातंय, तो खरंच राम सेतू आहे का? यासंदर्भातही त्यांनी संसदेला माहिती दिली.
जितेंद्र सिंह यांनी आपल्या उत्तरात तो राम सेतुच (ram setu) आहे की इतर कोणतं बांधकाम, याविषयी खात्रीशीर दावा करता येणं कठीण आहे, असं म्हटलं आहे. “राम सेतुसंदर्भात बोलायचं, तर त्यात आमच्या काही मर्यादा आहेत. कारण यासंदर्भातला इतिहास जवळपास १८ हजार वर्षांपूर्वीचा आहे. आणि इतिहासकालीन दाखल्यांचा विचार करता या पुलाची लांबी ५६ किलोमीटर इतकी आहे”, असं सिंह राज्यसभेत म्हणाले.
“मात्र, त्या ठिकाणी असणाऱ्या अवशेषांमध्ये एक प्रकारचं सातत्य आपल्याला दिसून येतं. त्यावरून आपल्याला नक्कीच काही अंदाज बांधता येतील”, असंही सिंह यांनी नमूद केलं.
दरम्यान, असं जरी असलं, तरी तिथे नेमका (ram setu) पूलच होता किंवा त्या ठिकाणी नेमकं कोणतं बांधकाम होतं, हे नेमकं सांगता येणं कठीण असल्याचं सिंह म्हणाले. “त्या ठिकाणी नेमकं कोणतं बांधकाम होतं हे नेमकं सांगता येणं कठीण आहे. पण तिथे काही प्रत्यक्ष किंवा काही अप्रत्यक्ष खुणांवरून आणि अवशेषांवरून मात्र, असं म्हणता येईल की तिथे एक बांधकाम होतं”, असं सिंह यांनी आपल्या उत्तरात नमूद केलं आहे.