‘बुद्धिजीवींना झाले आहे स्वत्वाचे विस्मरण’
पणजी ( किशोर अर्जुन) :
सध्याच्या काळातील देशाच्या राजकारणातील वाढती धर्मांधता आणि त्याद्वारे सर्वसामान्यांनाच संभ्रमित करून वेठीस धरले जात आहे. अशावेळी सर्वसामान्य माणूस बुद्धिजीवी लोकांकडे अत्यंत आशेने पहात असतात. पण ते बुद्धिजीवी देखील आपला विवेक हरवून बसले आहेत. स्वत्वाचेच विस्मरण होऊन ते देखील उदासीन झालेले आहेत, आणि हे सगळे रखरखीत वास्तव ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’मध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ज्या काळाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार मिळतो आहे, तो मला जास्त महत्त्वाचा आहे. अशा शब्दांत साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध लेखक प्रवीण बांदेकर यांनी ‘राष्ट्रमत’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या प्रवीण बांदेकर यांच्या टोकदार वर्तमान मांडणार्या कादंबरीला मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादेमीचा 2022 सालाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर साहित्य रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे, प्रसिद्ध लेखक आणि ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, प्रसिद्ध साहित्य अभ्यासक नितीन रिंढे यांच्या परीक्षक मंडळाने ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ची निवड केली. त्यानिमित्ताने प्रवीण बांदेकर यांच्यासोबत विशेष संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
भालचंद्र नेमाडे यांनी रुजुवात केलेल्या देशीवादी साहित्यधारेचे प्रवीण बांदेकर हे नव्या पिढीचे दिशादर्शक मानले जातात. ‘चाळेगत‘, ’इंडियन अॅनिमल फार्म’ या बहुचर्चित कादंबर्यानंतर प्रकाशित झालेली ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ ही त्यांची कादंबरी ही याच देशीवाद साहित्यपरंपरेला पुढे नेणारी आहे. त्याबद्दल त्यांना विचारले असता, ‘देशीवाद हा माझ्या एकूणच जगण्याचा धर्म आहे‘ असे नमूद करत, माझे एकूण जगणेच माझ्या विचारप्रकियेमध्ये येते आणि ते विचार आपसूकच माझ्या लिखाणातून समोर येत असतात. आपण ज्या कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमीतून आलेलो आहे, तिथे देशीवाद, म्हणजेच आपल्या मुळांशी घट्ट धरून राहणे हा स्थायिभावच असल्याचे ते आवर्जून सांगतात.
‘कोंकणीची तुलना इतर भाषांसोबत करू नये’
माझे कुटुंब मूळचे गोव्याचेच. धर्मांतरणाच्या जुलमी काळामध्ये पूर्वजांनी गोव्यातून कोकणात मुक्काम हलवला. असे असले तरी माझे आजदेखील गोव्यासोबत आणि कोंकणी साहित्य, साहित्यकारांसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कोंकणी ही स्वतंत्र आणि सक्षम भाषा आहे. ही भाषा स्वत:चे भान, स्वत:ची संस्कृती आणि स्वत:चे अस्तित्व घेऊन साहित्य निर्मिती करते आहे, जे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे या भाषेची मराठी किंवा इतर कोणत्याच भाषेसोबत तुलना करता कामा नये, असेही यावेळी प्रवीण बांदेकर यांनी आवर्जून सांगितले.
जागतिकीकरणाच्या सध्याच्या स्पर्धेमध्ये एकूणच सगळे सपाटीकरण होते आहे. यामध्ये आपली भूवैशिष्ट संस्कृती आपण हरवत चाललो आहोत. अशावेळी आपले स्वत्व टिकवून ठेवण्यासाठी देशीवादाचे तत्त्व महत्त्वाची भूमिका बजावत असते. आणि माझ्या लिखाणाचेही तेच सत्त्व आहे.
– प्रवीण बांदेकर,
साहित्य अकादमीप्राप्त लेखक.