
‘अवैध ऑनलाइन गेमिंगला आळा घालणार’
गोवा विधानसभा अधिवेशनाच्या सातव्या दिवशी बुधवारी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यातील बेकायदेशीर ऑनलाइन गेमिंग आणि बेकायदेशीर (मिनी) कॅसिनोंचा मुद्दा उपस्थित केला होता.
त्यावर बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी तामिळनाडू ऑनलाइन जुगार प्रतिबंधक कायद्याचा अभ्यास करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.
आलेमाव म्हणाले की, “युवक ऑनलाइन गेमिंगला बळी पडत आहेत आणि तोट्यामुळे आत्महत्या करत आहेत. बेकायदेशीर ऑनलाइन गेमिंगवर कठोर कारवाई व्हायला हवी. काणकोण वगळता राज्यातील प्रत्येक मतदारसंघात हे बेकायदेशीर उपक्रम सुरू आहेत. त्यातून दररोज सुमारे 30 कोटींची उलाढाल होते. लोकांचे पैसे बुडतात.
आलेमाव यांनी तामिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने त्यांचा कायदा अंमलात आणला आहे त्याच पद्धतीने गोव्यातही तो लागू करावा, अशी सूचना केली. ज्याद्वारे बेकायदेशीर ऑनलाइन गेम आणि जुगाराला आळा घालणे सोपे होईल.
याबाबतचे अॅप्स कोण चालवते हे सर्वांना माहीत आहे. आगामी पिढी बिघडत चालली आहे. सरकारने निष्पाप लोकांच्या जिवाशी खेळू नये.
आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस आणि काँग्रेसचे आमदार अल्टोन डिकोस्टा यांनीही या विषयावर मते मांडली.
त्यावर बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की ऑनलाइन गेमिंग ही एक गंभीर समस्या आहे आणि म्हणूनच सरकार त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पावले उचलत आहे.
मी अधिकार्यांना तामिळनाडू कायद्याचा अभ्यास करण्यास सांगेन आणि गरज पडल्यास आम्ही त्यादृष्टीने विचार करू. परंतु, त्याआधी किऑस्क (बेकायदेशीर कॅसिनो) मशीन चालवणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
पोलिसांनी यापूर्वी अशा बेकायदा कॅसिनोंवर छापे टाकून कारवाई करून त्यांचे धंदे बंद केले आहेत. या वर्षी जुलैपर्यंत सात गुन्हे दाखल झाले आहेत. काही आरोपींना अटक केली आहे.