‘वेदांतने आमोण्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी’
पणजी :
उच्च न्यायालयाचा आदेश असुनही आमोणा येथील वेदांत लिमिटेडच्या पिग-आयर्न प्लांटने अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न दिल्याने सरकारने हस्तक्षेप करावा आणि त्यांना न्याय द्यावा अशी मागणी काँग्रेसने सोमवारी केली.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस श्रीनिवास खलप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास अपयशी ठरले असून ते केवळ भांडवलदारांना मदत करत आहे.
काँग्रेस नेते खेमलो सावंत हेही उपस्थित होते.
“आमोणा येथील परिसरातील पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पर्यावरण बिघडवण्यास आणि त्यांच्या पिकांचे नुकसान करण्यासाठी वेदांता कंपनी जबाबदार आहे अशी तक्रार केली होती. तद्नंतर उच्च न्यायालयाने कंपनीला आदेश देताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास सांगितले होते. परंतु आजपर्यंत त्यांना एक रुपयाही मिळालेला नाही,” असे खलप म्हणाले.
ते म्हणाले की, आमोणा येथील वेदांत लिमिटेडच्या पिग-आयर्न प्लांटने केलेल्या प्रदूषणाची शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही.
“पिकांचे नुकसान झाल्याने शेतीची कामे थांबवण्यात आली. हा परिसर प्रदूषित असल्याने आणि सरकार कोणतीही कारवाई करत नसल्याने लोक नवीन पिके घेऊ शकत नाहीत,” असे खलप म्हणाले.
खेमलो सावंत म्हणाले की, वेदांता कंपनीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये न्यायालयाने डिचोली येथील उपजिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले होते.
‘‘पण एकाही शेतकऱ्याला एक रुपयाही मिळालेला नाही. लोक नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. सुमारे 170 शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या, मात्र त्यांना दिलासा मिळालेला नाही. येथील प्रदूषण रोखण्यातही सरकार अपयशी ठरले आहे, असे सावंत म्हणाले.
ते म्हणाले की, अधिकारी आश्वासने देत आहेत, मात्र ठोस काहीच होत नाही. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व मुख्यमंत्री प्रमोद सावंत करत असल्याने या अधिकाऱ्यांवर दबाव आहे, असे काँग्रेस नेते म्हणाले.
…