कुंडई येथील अपघातात एकाचा मृत्यू…
Goa Accident: फोंडा-पणजी महामार्गावरील कुंडई येथे बुधवारी संध्याकाळी एक भरधाव ट्रक थेट रस्त्याकडेला असलेल्या दुकानात घुसला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
सर्वेश बसाक (वय ३२, मूळ राहणार पश्चिम बंगाल, सध्या राहणार कुंडई) असे मृताचे नाव आहे. तर दर्शनी दयानंद गावडे (वय ४५, कुंडई), उमाजी दीपक नाणूसकर (वय ३१, मूळ रा. तिरोडा – सिंधुदुर्ग पण सध्या राहणार कुंडई), विश्वजीत म्हसकर (वय ३४, कुंडई) तसेच ट्रकचालक बिजील थॉमस (वय ३१) व शरथ (वय ३४, दोघेही मूळ कोची – केरळ) हे जखमी झाले आहेत.
जखमींपैकी विश्वजीत म्हसकर याला पुढील उपचारासाठी बांबोळी इस्पितळात दाखल केले गेले. इतरांवर फोंडा उपजिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.
हा अपघात आज (बुधवारी) संध्याकाळी पाचच्या सुमारास घडला. दरम्यान, मानसवाडा – कुंडई हा रस्ता केवळ सर्विस रोड म्हणून ठेवून पेट्रोलपंपजवळून काढलेल्या रस्त्यावरून एकेरी वाहतूक न करता दुहेरी वाहतूक सुरू करा, अशी मागणी स्थानिक नागरिकांना केली आहे.
१५ दिवसांत मागणी मान्य न केल्यास कुंडईत रास्ता रोको करण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे.
मंगलोर येथून मासे घेऊन रत्नागिरी येथे निघालेल्या केएल ०७ सीपी २५८० या क्रमांकाचा ट्रक कुंडई येथे उतरणीवर येताच ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने या ट्रकने आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली. नंतर ट्रक दुकानात घुसला. अपघातामुळे मोठा आवाज झाला.
फोंडा पोलिस व अग्निशामक दलानेही घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. चिऱ्यांचे दुकान उद्धवस्त झाले. एक भिंत तेवढी शिल्लक राहिली. ढिगाऱ्याखाली दोन तास अडकलेल्या सर्वेश बसाक याचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त ट्रक उचलण्यासाठी दोन क्रेन आणाव्या लागल्या.
अपघातात एक गायही दगावली. तर दोन दुचाक्यांचेही नुकसान झाले. जखमी दर्शनी गावडे या कुंडई येथील औद्योगिक वसाहतीतील काम आटोपून घरी परतत होती. तिच्या हाताला जबर मार बसला आहे.