‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दिवाळीपूर्वी घेण्यास प्राधान्य’
Sports Minister Govind Gaude: गोव्यात यावर्षी नियोजित असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनासंदर्भात पाहणी करण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) शिष्टमंडळ 6 ते 11 मार्च या कालावधीत राज्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी दिली. स्पर्धा दिवाळीपूर्वी घेण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्पर्धा आयोजनासंदर्भात गोवा ऑलिंपिक संघटनेच्या (जीओए) पदाधिकाऱ्यांनी बुधवारी क्रीडामंत्री गावडे यांची पर्वरी येथे भेट घेतली व आयोजनासंदर्भात चर्चा केली. स्पर्धा ऑक्टोबर अथवा नोव्हेंबरमध्ये घेण्याची माहिती क्रीडामंत्र्यांनी जीओए शिष्टमंडळास दिली.
स्पर्धेची निश्चित तारीख आयओए आणि केंद्र सरकारशी चर्चा करून ठरविण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याची कामगिरी चांगली व्हावी या उद्देशाने खेळाडूंना पूर्ण सहकार्य करण्याचे, तसेच स्पर्धेपूर्व सर्व आवश्यक सुविधा तयार करण्याचे आश्वासनही क्रीडामंत्र्यांनी दिले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राज्यस्तरीय क्रीडा संघटनांबरोबरच तालुका व ग्राम पातळीवरील क्लबनाही सामावून घेण्याचे क्रीडामंत्री गावडे यांनी प्रतिपादन केले.
यावेळी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक गीता नागवेकर, प्राधिकरणाचे सहाय्यक संचालक नवीन आचार्य, जीओए सचिव गुरुदत्त भक्ता, पदाधिकारी अर्विन सुवारिस, राजू मंगेशकर, जयेश नाईक, सिद्धार्थ सातार्डेकर, निशा मडगावकर, संदीप हेबळे यांची उपस्थिती होती.