
‘श्रमपरिहार’ला केले ‘लोकसंवाद’ ; जनाची ‘मेहनत’, दुर्गादासकडून हायजॅक करण्याचा प्रयत्न?
काणकोण :
गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी काणकोणचे तडफदार नेते जनार्दन भांडारी यांनी आयोजीत केलेला श्रमपरिहार कार्यक्रम हा गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांचा लोकसंवाद कार्यक्रम होता असे ट्विट करुन काणकोणकरांचा अपमान केला आहे अशी भावना अनेक काणकोणवासीयांनी व्यक्त केली असून हा प्रकार म्हणजे जनार्दन भंडारीची मेहनत हायजॅक करण्याचाच प्रयत्न असल्याचे स्थानिक म्हणत आहेत.
आम्ही आमचे तडफदार नेते जनार्दन भांडारी यांच्या अगत्याच्या आमंत्रणावरुन सदर श्रमपरिहार तथा स्नेहभोजन कार्यक्रमास हजर होतो. जर सदर कार्यक्रम गोवा फॉरवर्डने आयोजीत केला होता तर त्यांच्या पक्षाचा बॅनर तेथे का लावला नव्हता? असा सवालदेखील उपस्थितांनी दुर्गादास कामत यांना केला आहे.
दुर्गादास कामत यांची x पोस्ट:
जनार्दन भांडारी हे एक साधेभोळे तळागाळातले कार्यकर्ते असून, त्यांचा वापर अनेकवेळा धूर्त राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी करुन घेतला आहे. जनार्दन भांडारी यांनी आयोजीत केलेल्या स्नेहभोजनाच्या फोटोंचा गैरवापर करु नये असे जाहिर भाष्य करुन दुर्गादास कामत यांनी भंडारी समाजाचाही अपमान केला आहे, असे मत काणकोणच्या ज्येष्ठ नागरीकांनी व्यक्त केले.
दरम्यान, काणकोण येथे परवा आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमावरुन स्थानिक राजकारण तापले असून, स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्त्यानीही गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केलेल्या ट्विटवर आक्षेप घेतला आहे. कॉंग्रेसचे भक्कम कार्यकर्ते जनार्दन भांडारी हे गोवा फॉरवर्डच्या दावणीला बांधले गेलेत असे चित्र निर्माण करण्याचा दुर्गादास कामत यांनी प्रयत्न केला आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी दुर्गादास कामत यांना आताच आवर घालावा अशी मागणी जनार्दन भंडारींच्या समर्थकांनी केली आहे.
एकेकाळी भाजपशी जवळीक असलेले दुर्गादास कामत हे कॉंग्रेस व गोवा फॉरवर्डच्या नेत्यांमध्ये दुफळी तयार करण्याचा प्रयत्न करतात की काय अशी भावना आता लोकांमध्ये बनली आहे.
