पणजी :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपले ‘परम मित्र’ अदानी यांना वाचवण्यासाठी लोकशाहीचे नुकसान करत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी बुधवारी सांगितले की, राहुल गांधी यांची लोकसभेतून अपात्रता नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे, मात्र लोकांचा आवाज दाबण्याची जी कृती भाजप सरकार करीत आहे त्याच्यावर मात करण्यात काँग्रेस विजयी होईल.
राहुल गांधी यांनी चोर आणि घोटाळेबाजांचा पर्दाफाश केल्याने मोदी सरकार त्यांना लक्ष्य करत आहे असे पणजी येथे पत्रकार परिषदेत बोलताना डॉ शमा मोहम्मद म्हणाल्या.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर आणि मिडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर हेही यावेळी उपस्थित होते.
‘राहुल गांधी यांना अपात्र ठरवणे हे अलोकतांत्रिक आहे. त्यांना कमकुवत करण्यासाठी सत्ताधारी पक्ष सर्व काही करतील, परंतु आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहुन आपली लोकशाही वाचवणार ” असे डॉ. शमा मोहम्मद म्हणाल्या.
2019 मध्ये कर्नाटकातील कोलार येथे राहुल गांधींच्या भाषणाविषयी बोलताना डॉ. शमा मोहम्मद म्हणाल्या की, तक्रारदार भाजप आमदार पूर्णेश मोदी यांचा याकडे थेट संदर्भ नव्हता.
‘घटना कर्नाटक मध्ये घडली तर गुजरातमधील सुरत येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. कोलारमध्ये भाषण केले होते, ज्याचा सुरतशी कोणताही संबंध नाही. ज्याच्यावर आरोप झाले आहेत तो जर इतर राज्यातील असेल तर त्याला समन्स पाठविण्या अगोदर कलम २०२ खाली दंडाधिकाऱ्याने स्वत: किंवा पोलिस अधिकाऱ्याकडून थेट तपास करावा लागतो. मात या प्रकरणात असे काहीही झालेले नाही,” असे त्या म्हणाल्या.
“या प्रकरणात शिक्षा 2 वर्षांपेक्षा कमी असू शकते. परंतु इथे शिक्षेचे प्रमाण 2 वर्षे होते कारण यामुळे भाजप सरकारला त्याला अपात्र ठरवण्याचा मार्ग मोकळा झाला,” असे तिने निदर्शनास आणून दिले.
संसदेत केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी अदानी मेगा घोटाळ्यावर प्रश्न विचारल्याबद्दल त्यांना हेतुपुरस्सर लक्ष्य करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी म्हणाले होते की, अदानीकडे संबंधीत असलेल्या ’शॅल कंपन्यां’ मध्ये 20,000 कोटी रुपये आले आहेत, हा पैसा कोणाचा आहे? असा प्रश्न त्यांनी केला होता, असे त्या म्हणाल्या.
अदानी आणि मोदींच्या संबंधांबद्दल राहुल गांधी यांनी प्रश्न केले होते. मात्र सत्ताधारी पक्ष या प्रश्नांवर काहीच बोलले नाही असे डॉ शमा मोहम्मद म्हणाल्या.
त्या म्हणाल्या की, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्ष संसदेत व्यत्यय आणून कामकाज रोखत होता.
“राहुल गांधीं यांना भाजपच्या नेत्यांनी संसदेत बोलण्याची संधी दिली नाही. कारण तो मोदी आणि अदानी यांच्यातील संबंध उघड करत होता,” असे ती म्हणाली.
“काँग्रेस पक्ष ‘अदानी’ प्रकरणाच्या संदर्भात संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी करत आहे. आम्ही घाबरणार नाही. काँग्रेस पक्ष भारतातील लोकांचा आवाज बनून बोलणार आणि आम्ही काहीही झाले तरी या समितीच्या चौकशीच्या आमच्या मागणीपासून मागे हटणार नाही,, ” असे त्या म्हणाल्या.
त्या म्हणाल्या की, राहुल गांधी यांना नियोजनबद्ध पद्धतीने लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले आणि त्यामागची घाई देशातील जनतेने पाहिली आहे.
अमित पाटकर म्हणाले की, अदानी आणि मोदींच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यात आले आहे. “त्यानंतर लगेचच त्यांना अपात्र ठरवण्याचा कट रचला गेला. सत्ताधारी पक्ष जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.
“ही खरे तर लोकशाहीची हत्या आहे आणि म्हणून आपण आपली लोकशाही वाचवण्यासाठी संघटित व्हायला हवे. भाजपने गोव्याला कोळशाचे केंद्र बनवले आहे आणि ‘अदानी’च्या कोळशाची वाहतूक करण्यासाठी दुहेरी रेल्वे ट्रॅक करण्याची प्रक्रिया सुरू करून आमच्या लोकांवर अन्याय केला आहे,” ते म्हणाले.