‘मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजने’वर महिला काँग्रेसचा आक्षेप
पणजी :
“मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजने” वर तीव्र आक्षेप घेत गोवा प्रदेश महिला काँग्रेसने शनिवारी राष्ट्रीयीकृत बँक नसलेल्या अॅक्सिस बँकेत खाते उघडण्यास संस्थांना सांगण्यामागील सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे आणि भाजप नेत्याची पत्नी या बँकेच्या उच्च पदावर आहे का असा प्रश्न केला आहे.
माहिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकार ही योजना राबवून स्वत:चा प्रचार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
उपाध्यक्ष रेणुका देसाई, सरचिटणीस सई वळवईकर, पलेजिया रापोज आणि पणजी महिला गटाध्यक्ष लविनीया डाकॉस्ता उपस्थित होत्या.
“अॅक्सिस बँकेत उच्च पदावर असलेल्या भाजप नेत्याच्या पत्नीला खूश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे का? अचानक जुनी परंपरा बदलून सरकार खाजगी क्षेत्रातील बँकेवर पूर्ण विश्वास कसा ठेवत आहे,” असा सवाल बीना नाईक यांनी केला.
नाईक म्हणाल्या की, “मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजना”, जी अनुदानित शाळांसाठी राबविण्यात येणार आणि त्यांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेतून न करता, अॅक्सिस बँकेद्वारे ऑनलाइन पद्धतीने केले जाईल, हे चुकीचे आहे.
“सरकार राष्ट्रीयीकृत बँकांकडून खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये पगार वितरणाची व्यवस्था का करत आहे? आदीच 28 जणांनी भारताच्या बँका कशा लुटल्या हे देशाने पाहिले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी या सरकारने काहीही केले नाही. दहा हजार कोटींहून अधिक पैसे त्यांनी लुटले आहे,” असे तिने निदर्शनास आणून दिले.
त्या म्हणाल्या की भाजपने काळा पैसा देशात परत आणण्याचे व प्रत्येक भारतीय नागरिकांच्या खात्यात 15 लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते. ” हे पैसे कुठे गेले,” अशा प्रश्न नाईक यांनी केला.
“डबल इंजिन सरकार हे स्वयं-प्रचार करणारे सरकार आहे, ज्याने कोविड लसीकरण प्रमाणपत्रावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला होता. काँग्रेसच्या कार्यकाळात आम्ही अशा गोष्टी कधी केल्या नाहीत,” असे त्या म्हणाल्या.
वैदिक काळात एकलव्याने द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा दिली होती. ती सन्मानाने दिली होती. शिक्षकांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत, ती निकाली निघत नाहीत, मग याला तुम्ही गुरुदक्षिणा कसे म्हणता, असा सवाल बीना नाईक यांनी केला.
“पगार मुख्यमंत्र्यांच्या खिशातून दिला जातो की राज्याच्या तिजोरीतून? याला ‘लोकदक्षणा’ म्हटले पाहिजे, मुखमंत्री गुरु दक्षिणा नाही,” असे ती म्हणाली.
“या योजनेवर सरकारचा कोणता छुपा अजेंडा आहे? पुढच्या निवडणुकीसाठी ते त्यांच्या नेत्यांचे फोटो वापरून प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
तिने असेही निदर्शनास आणून दिले की राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते उघडताना केवळ 1500 रुपये आकारले जातात, ज्यामध्ये विम्यासाठी 500 रुपये समाविष्ट आहेत, तर खाजगी बँका 5000 रुपये आकारतात. “जर खातेधारक त्यांच्या खात्यावर 5000 रुपये ठेवू शकले नाहीत तर त्यावर पैसे आकारले जातात,’’ असेही नाईक यांनी निदर्शनास आणून दिले.
बीना नाईक यांनी राष्ट्रीयीकृत बँकांमधून खासगी बँकांमध्ये खाती स्थलांतरित करून सरकारने सध्याचा सेटअप बदलू नये, अशी मागणी केली.