‘काय’ म्हणाले विजय सरदेसाई भाजप प्रवेशाबद्दलच्या चर्चेवर?
Vijai Sardesai: गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी अलिकडेच पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरुन मडगावच्या रस्त्यांची पाहणी केली. सरदेसाई यांच्या पाहणीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.
दरम्यान, विजय सरदेसाई भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सध्या राज्यात सुरु आहेत. यावरुन सरदेसाई यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले आहे.
विजय सरदेसाई यांनी भाजपमध्ये प्रवेशावरुन पसरवल्या जात असलेल्या अफवांबाबत टीका केली. प्रत्येक विधानसभा अधिवेशनापूर्वी भाजप अशा प्रकारची खेळी करते असे सरदेसाई म्हणाले.
विधानसभेचे अधिवेशन जवळ आले की अफवा पसरवल्या जातात. आम्ही सातत्याने गोंयकरांचा प्रश्न मांडत आलो असून आगामी अधिवेशनात देखील गोंयकरांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरणार असल्याचे सांगत विजय सरदेसाई यांनी भाजप प्रवेशाच्या शक्यता खोडून काढली.
येत्या 02 फेब्रुवारीपासून गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. 08 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत 2024-25 वर्षाचा राज्यासाठीचा अर्थसंकल्प सादर करतील.
अधिवेशन काळात 06 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा भेटीवर येत असल्याने त्यादिवशी अधिवेशनाचे कामकाज होणार नाही. अधिवेशनाचा एक दिवस वाढवून या दिवसाचे कामकाज 10 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती बीएसीच्या बेठकीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.