‘सहा महिन्यांत लोहिया मैदानात सार्वजनिक सुविधा उपलब्ध करा’
मडगाव :
लोहिया मैदानाच्या नूतनीकरणावर शासनाने जवळपास ३ कोटी रुपये खर्च केले आहेत. दुर्दैवाने, नियोजनशून्य आणि निकृष्ट कामामुळे या ऐतिहासिक जागेचा वापर करणाऱ्या सर्वांची गैरसोय झाली आहे. सरकारने विद्यूत ट्रान्सफॉर्मर हलवावा, स्टेजचा विस्तार करावा आणि सार्वजनिक सुविधा त्वरित निर्माण कराव्यात अशी माझी मागणी आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी मी सरकारला सहा महिन्यांचा अल्टिमेटम देतो, असा इशारा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिला.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे आयोजित गोवा क्रांती दिन कार्यक्रमात डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या पुतळ्याला आणि हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर ते बोलत होते. कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता, दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, वरिष्ठ उपाध्यक्ष एम.के. शेख आदी यावेळी उपस्थित होते.
गोवा राज्याचे संरक्षण करण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. गोव्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे दररोज एका व्यक्तीचा मृत्यू होतो. सरकार इव्हेंट कार्यक्रमांच्या आयोजनात व्यस्त आहे. या अक्षम सरकारच्या विरोधात आणखी एक क्रांती सुरू करण्याची वेळ आली आहे, असे कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गोव्याच्या पर्यावरणाचा आणि अस्मितेचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने मुक्त झालेल्या या सुंदर भूमीला वाचवण्यासाठी आपण एकजूट होऊ या, असे प्रतिपादन दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी
यावेळी बोलताना केले.
तत्पूर्वी सर्व काँग्रेस नेत्यांनी डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या पुतळ्याला आणि हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. वरिष्ठ उपाध्यक्ष एम.के. शेख यांनी स्वागत केले तर दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी आभार मानले. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बिना नाईक, जिल्हा पंचायत सदस्या मिशेल रिबेलो, सरचिटणीस एव्हरसन वालीस यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.