गोवा
‘या’ भाषेलाही गोव्यात मिळणार मानाचं स्थान
डिचोली :
नवीन शैक्षणिक धोरणात राष्ट्रीय आणि मातृभाषेवर भर देण्यात आला आहे. संस्कृत भाषा शिकण्यासाठी शाळेतील किमान 15 विद्यार्थी तयार झाले, तर त्यांच्यासाठी सरकार स्वतंत्र संस्कृत शिक्षकाची नेमणूक करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod sawant) यांनी दिली.
डिचोली येथील केशव सेवा साधना शाळेत आयोजिलेल्या सात दिवसीय निवासी संस्कृत प्रबोधन वर्गाचे रविवारी उदघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राजभाषा संचालनालयाच्या सहकार्याने संस्कृत भारतीतर्फे या प्रबोधन वर्गाचे आयोजन केले आहे. यावेळी व्यासपीठावर उद्योजक तथा केशव सेवा साधना शाळेचे अध्यक्ष सागर शेट्ये, विठ्ठल भट, मनोहर काजरेकर, प्रसाद उमर्ये आदी उपस्थित होते.
सर्व ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत. आयुर्वेदिक शिक्षणातही संस्कृत भाषा आवश्यक आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी भवितव्याचा विचार करुन संस्कृत भाषेमध्ये रुची दाखवावी, असे आवाहनही डॉ. सावंत (Pramod sawant) यांनी केले. सात दिवस चालणाऱ्या या निवासी संस्कृत प्रबोधन वर्गात कोकण प्रांतातून एकूण 90 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
यावेळी डॉ. सावंत (Pramod sawant) म्हणाले की, प्राथमिक स्तरापासून संस्कृत भाषेचे धडे विद्यार्थ्यांना मिळावेत, यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. संस्कृत ही करिअर ठरविणारी भाषा आहे, याचे भान ठेवून विद्यार्थ्यांनी ती आत्मसात करावी. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. सुसंस्कारित, आदर्श नागरिक घडवण्याचे सामर्थ्य केवळ संस्कृत भाषेतच आहे. अशी ही संस्कृत भाषा संपूर्ण विश्वाची भाषा ठरावी, यासाठी भारत प्रयत्नशील आहे.