google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

‘गोव्याच्या संमतीनेच म्हादई पाणी वाद मिटवला’

केंद्रीय जलआयोगाने कळसा-भांडुराच्या सुधारित प्रकल्प आराखड्याला मंजुरी दिल्यामुळे राज्य सरकारला म्हादई नदीच्या पाणी प्रश्‍नाबाबत जोरदार झटका मिळाला असतानाच गोव्याच्या संमतीनेच म्हादई पाणी वाद मिटवला, असे अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हुबळीतील सभेत केल्यामुळे त्याचे पडसाद गोव्यात उमटले आहेत.

शहा यांच्या या वक्तव्यावर विरोधक आक्रमक झाले असून हा खरा भाजपचा दुहेरी चेहरा असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

जलआयोगाच्या डीपीआर मंजुरीनंतर गोव्यात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्येही असंतोष पसरला आहे. याचे पडसाद राज्यभर उमटले असून विविध सामाजिक संघटनांसह पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते जनजागृतीसाठी झटत आहेत.

म्हादई बचाव चळवळीने गावोगावी आंदोलन छेडले आहे. कॉंग्रेसने ‘म्हादई जागोर’ सुरू केला आहे. अशा कठीण व आणीबाणीच्या प्रसंगीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हुबळी येथील भाजपच्या जाहीर सभेत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला म्हादई पाणी तंटा गोवा सरकारच्या संमतीनेच भाजपने सोडवला असून याचे श्रेय कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना जाते.

यामुळे उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणी मिळेल आणि अनेक दिवसांपासून पाण्यासाठी तहानलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे, असे विधान केले.

दस्तुरखुद्द शहा यांच्या या वक्तव्यामुळे कॉंग्रेसला आपल्या ‘म्हादई जागोर’ला प्रोत्साहन मिळाले आहे, तर राज्य सरकारतर्फे सुरू असलेले प्रयत्न खरे आहेत का, यावरही आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहा यांच्या या वक्तव्यामुळे गोव्यातील विरोधक आक्रमक झाले असून हा भाजपचा दुहेरी राक्षसी चेहरा आहे, असे म्हणत गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने पायउतार व्हावे, असे विधान करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

तर कॉंग्रेसने सरकारवर तोफ डागत मुख्यमंत्री सावंत हे आतापर्यंत म्हादईसंदर्भात धडधडीत खोटे बोलत होते, हे गृहमंत्री शहा यांनी उघड केले आहे. कर्नाटकात कोणीही तहानलेले शेतकरी नसून भाजप हा सत्तेसाठी भुकेलेला पक्ष आहे. या भाजपनेच जीवनदायिनी म्हादईचा खून केला आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सोडले आहे.

‘‘ कर्नाटकातील नेत्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे, की गोव्यातील भाजपच्या सरकारला विश्‍वासात घेऊन कर्नाटकातील तहानलेल्या शेतीला म्हादईचे पाणी देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतो.

मी आज सोनिया गांधी यांच्या 2007 सालच्या गोव्यातील भाषणाची आठवण करून देतो. त्यांनी म्हटले होते, की म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवण्यास मंजुरी दिली जाणार नाही. तसेच 2022 सालच्या कॉंग्रेस जाहीरनाम्यातही त्यांनी म्हादईचे थेंबभर पाणीही कर्नाटकला वळवू देणार नाही.

हेच सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. भाजपने या दोन्ही राज्यांतील अनेक वर्षांपूर्वीचा वाद मिटवून म्हादईचे पाणी कर्नाटकला दिले आहे. त्यामुळे कर्नाटकातील काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना म्हादईचे पाणी मिळणार आहे.’’

शहा यांच्या सभेनंतर गोव्यात उमटलेल्या पडसादानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की कर्नाटकच्या डीपीआरला अद्याप आवश्यक पर्यावरणीय मंजुरी मिळालेली नाही.

गोवा सरकारने म्हादईप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाला लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. म्हादईच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी सरकार लढा देत राहील. माझे सरकार गोव्याच्या हिताचे रक्षण करेल, अशी ग्वाही मी गोव्यातील जनतेला देतो.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!