मडगाव – परमपूज्य पोप फ्रांसिस यांनी २०२४ मध्ये भारतात येण्याचे जाहीर केले आहे. पोप सायबांच्या भारत दौऱ्यात गोवा भेटीचा समावेश व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आवाहन करतो. आपण सर्वांनी पोपचे भव्य स्वागत करुया. गोवा आणि गोमंतकीयांना पोप सायबांचालआशीर्वाद लाभू दे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
पोप फ्रांसिस यांनी २०२४ मध्ये भारत भेट देण्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी #पोपइनगोवा हा हॅशटॅग देखील आपल्या समाजमाध्यमांवर सुरू केला आहे.
पोप जॉन पॉल- २ यांची फेब्रुवारी १९८६ मध्ये गोव्याला झालेली भेट राज्यातील अनेक कॅथलिक भाविकांच्या आणि इतर गोमंतकीयांच्या स्मृतीत आहे. परमपूज्य पोप जॉन पॉल-२ यांनी पणजीतील कांपाल मैदानावर सार्वजनिक प्रार्थना सभेला संबोधन केले होते. गोवा भेटीदरम्यान त्यांनी बिशप हाऊसमध्येही मुक्काम केला होता, अशी आठवण युरी आलेमाव यांनी करून दिली.
माझा जन्म १९८४ मध्ये झाला आणि पोप जॉन पॉल यांचा गोमंतकीयांना कोकणी भाषेत अभिवादन करतानाचा संग्रहित चित्रफीत पाहणेच मला शक्य झाले. पोप फ्रांसिस यांची पुढील वर्षी गोवा भेट झाल्यास माझ्यासारख्या नवीन पिढीतील तरुणांना त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळेल, असे युरी आलेमाव म्हणाले.
मी पंचायत, जिल्हा पंचायत, नगरपालिका आणि आमदार तसेच लोकप्रतिनिधींना तसेच कलाकार, खेळाडू, शिक्षणतज्ज्ञ, पर्यटन व्यावसायीक, सामाजिक कार्यकर्ते आणि गोमंतकीयांना आवाहन करतो की त्यांनी पोप फ्रान्सिस यांच्या भारत भेटीच्या घोषणेचे स्वागत करावे आणि त्यांच्या गोवा भेटीसाठी प्रार्थना करावी, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
या ऐतिहासिक दौऱ्याची तयारी आतापासूनच सुरू करावी, असे आवाहनही मी गोवा सरकारला करतो. आजपासून कामाला सुरुवात होवू द्या असे युरी आलेमाव यांनी सांगितले.