google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘मुख्यमंत्र्यांनी यावे आणि मी बांधलेल्या ख्रिस्ती दफनभूमीचे उद्घाटन करावे’

मडगाव :
काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गोव्याच्या 24 प्रमुख समस्यांवर डबल इंजिन भाजप सरकारचे रिपोर्ट कार्ड गोव्यातील जनतेसमोर सादर करण्याचे उघड आव्हान दिले.

दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन आणि दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांच्या उपस्थितीत मडगाव येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, “मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास नकार देणे म्हणजेच डबल इंजिन भाजप सरकारचे रिपोर्ट कार्ड नापास असल्याचे मान्य करणे होय असा जबरदस्त टोला अमित पाटकर यांनी हाणला.

माझे रिपोर्ट कार्ड दक्षिण गोव्यातील लोकांकडे आहे. मी माझा सर्व खासदार निधी वेगवेगळे प्रकल्प हाती घेवून संपवला आहे. दक्षिण गोव्यातील प्रत्येक गावात मी कामे केली आहेत. माझा रिवण येथे दफनभूमीचा एक प्रकल्प पूर्ण झाला आहे. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना शनिवार 17 फेब्रुवारी 2024 रोजी येऊन सदर दफनभूमीचे उद्घाटन करण्याचे निमंत्रण देतो, असे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी सांगितले.

आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून जाणून घ्यायचे आहे की, त्यांच्या डबल इंजीन सरकारच्या पुढच्या इंजिनने गेल्या ५ वर्षांत विरोधी पक्षाच्या खासदारांना आवश्यक पाठबळ आणि सहकार्य केले का, की त्यांचा आवाज दाबण्यासाठी खासदारांना संसदेतून बाहेर काढण्यात भाजप गुंतला होता?, असा सवाल अमित पाटकर यांनी केला.

काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारकडे तीन रेखीय प्रकल्प रद्द करणे, मोदी सरकारने दिलेला कळसा भांडुरा प्रकल्पाचा डीपीआर मागे घेणे, रिवण येथे हरित जमिनीवर प्रस्तावीत आयआयटी प्रकल्पाचा गोवा व गोमंतकीयांना लाभ, लोलयें काणकोण येथील फिल्मसिटीत गोमंतकीयांना उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी आणि लोलयें कोमुनीदादला होणारा फायदा यावर रिपोर्ट कार्ड सादर करण्याची मागणी केली.

आम्हाला गोवा सरकारने सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून आयोजित केलेल्या मेगा जॉब फेअरचा अहवाल जाणून घ्यायचा आहे, आम्हाला भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या 12 वर्षांत किती वेळा खाणकाम पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली याचा अहवाल जाणून घ्यायचा आहे. आम्हाला गोवा लोकायुक्तांनी दिलेल्या भ्रष्टाचाराच्या २१ प्रकरणांच्या चौकशीचा अहवाल जाणून घ्यायचा आहे. आम्हाला सिद्धी नाईकच्या गूढ मृत्यूच्या चौकशीचा अहवाल जाणून घ्यायचा आहे, असे अनेक मागण्या अमित पाटकर यांनी केल्या.

समाजकल्याण योजनांसाठी जवळपास 500 कोटींचा निधी देण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. औद्योगिक, व्यावसायिक आणि सरकारी कार्यालयातील थकबाकीदारांकडून 1400 कोटी वीज बिलांची वसुली प्रलंबित असल्याचेही ते म्हणाले.

खाणकाम, ग्रामीण कल्याण उपकर, हरित उपकर थकबाकीपोटी अदानी, जेएसडब्ल्यू, वेदांता इत्यादी बड्या कंपन्यांकडून 2000 कोटी रुपये का वसूल केले जात नाहीत, याचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी द्यावा, अशी मागणीही अमित पाटकर यांनी केली.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील अपुर्ण सुवीधा, खाण डंप पोलिसीत झालेला घोटाळा, जमिनीचे रुपांतरण व इतर विषयांवरही सरकारने त्वरीत स्पष्टीकरणाचा अहवाल सादर करावा असे अमित पाटकर यांनी नमूद केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!