
बाळ्ळी येथे बालरथचा अपघात; 4 विद्यार्थी जखमी
मडगाव :
कुंकळ्ळी परिसरातील एका हायस्कूलचा बलारथ बाळ्ळी येथे एका वळणावर रस्त्याकडेच्या घोळणीत उलटून झालेल्या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. आज सकाळी ८ वाजता ३४ विद्यार्थ्यांना घेऊन ही बस शाळेच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने स्थानिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जिल्हा प्रशासनाला याची माहिती देत तत्काळ दखल घेण्याची सूचना केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळ्ळी आरोग्य केंद्राजवळ आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वरील घटना घडली. कुंकळ्ळी परिसरातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शाळेत नेत असतानाच वळणावर बालरथाच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. वळणावर गाडी रस्त्याबाजूला गेली व घळणीत उलटली. यानंतर उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढले.
अपघातात जखमींपैकी १७ विद्यार्थ्यांना आतापर्यंत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी आणण्यात आलेले आहे. यांतील दोन मुलांच्या डोक्याला मार लागलेला आहे. त्यांना वैद्यकीय अधिकार्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा इस्पितळाचे जनसंपर्क अधिकारी सर्फराज यांनी दिली आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जिल्हा प्रशासनाला या अपघाताची माहिती दिली व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची दखल घेण्याच्या सूचना केल्या. या बालरथात एकूण ३४ विद्यार्थी प्रवास करत होते व अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ बाळ्ळी आरोग्य केंद्रात नेण्यात आले. कुंकळ्ळी अग्निशामक दलाला याबाबत सूचना करण्यात आलेल्या नाहीत. तर, कुंकळ्ळी पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. चालकाचा ताबा नेमका कशामुळे गेला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
”हा’ तर सरकारचा निष्पाप विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ’