‘रोजगार विनिमय पोर्टलवर रिक्त जागांची माहिती ‘त्या’ कंपन्यांनी दिली होती का?’
आतानासीयो मोंसेरात यांनी स्पष्टीकरण देण्याची युरी आलेमाव यांची मागणी
मडगाव :
गोव्याचे रोजगार मंत्री आंतानासीयो उर्फ बाबुश मोन्सेरात यांनी इंडोको आणि एन्क्यूब एथिकल्स द्वारे त्यांच्या गोवा प्लांट्ससाठी महाराष्ट्रात जाहिर केलेल्या रिक्त जागा गोवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या पोर्टलवर अधिसूचित केल्या होत्या का आणि सरकारने त्याबद्दल स्थानिक तरुणांना माहिती दिली होती का हे स्पष्ट करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
गोव्यात औद्योगिक आस्थापने असलेल्या दोन फार्मा कंपन्यांतर्फे महाराष्ट्रात नियोजित वॉक-इन-इंटरव्ह्यूच्या वादावर प्रतिक्रिया देताना, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोवा सरकारच्या पोर्टलचा एक स्क्रीनशॉट जारी करुन एनक्यूब एथिकल्सने “कोणत्याही रिक्त जागा उपलब्ध नाहीत” असे दर्शविल्याचे उघड केले आहे.
https://x.com/yurialemao9/status/1793586429341434030?s=46&t=0ra0gnqUTsglV4j4uw5pkg
एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या पोर्टलवर रिक्त जागा अधिसूचित करणे खाजगी कंपन्यांना बंधनकारक आहे. आज जेव्हा मी सरकारी पोर्टलवर तपासले, तेव्हा एन्क्युब एथिकल्स औद्योगिक आस्थापनात कोणत्याही जागा रिक्त नसल्याचे नमूद केले आहे, तर इंडको कंपनीकडे नेमक्या किती जागा आणि पदे उपलब्ध आहेत याबाबत स्पष्टता नाही, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
गोव्यात कार्यरत असलेल्या खासगी कंपन्यांच्या भरती प्रक्रियेवर गोव्यातील भाजप सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कर्मचाऱ्यांची भरती करताना विविध कंपन्यांकडून सर्रासपणे होणारे नियमांचे उल्लंघन नियंत्रित करण्यासाठी सरकारकडे कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
रोजगार मंत्री आतानासीयो उर्फ बाबुश मोन्सेरात यांनी गेल्या काही वर्षात खाजगी कंपन्यांनी केलेल्या सर्व भरतींची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत आणि गोवा विधानसभेच्या आगामी अधिवेशनात अहवाल सादर करावा. गोव्यातील खाजगी क्षेत्रातील रोजगाराची नेमकी परिस्थिती सर्वांना कळू द्या, असे युरी आलेमाव म्हणाले.
गोवा विधानसभेत चुकीची उत्तरे आणि माहिती देऊन सरकारने वेळोवेळी आमदार आणि गोमंतकीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. बहुचर्चित मेगा जॉब फेअर हा एक मोठा फार्स ठरला. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या गोमंतकीयांची नोंदणी ठेवण्यासाठी सरकारकडे कोणतीही यंत्रणा नाही, असे युरी आलेमाव म्हणाले.
आठव्या गोवा विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनापासून मी बेरोजगारीचा मुद्दा मांडत आहे. खासगी कंपन्यांमध्ये भरती झालेल्या गोमंतकीयांची माहिती व आकडेवारी गोळा करण्यासाठी विरोधकांकडून सातत्याने मागणी करण्यात येत असतानाही, भाजप सरकारने बिगर गोमंतकीयांना मागील दाराने प्रवेश देण्यासाठी जाणूनबुजून कोणतीही पावले उचलली नाहीत, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.