‘विधानसभा सत्र चार दिवस करुन एका दिवसाचा ‘राम नाम सत्य है’ केला’
पणजी :
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये विरोधकांना तोंड देण्याची हिंमत नाही. गोवा विधानसभेच्या सचिवांनी पाच दिवसांचे विधानसभेचे अधिवेशन कमी करून चार दिवसांचे केल्याचे सुचनापत्र जारी केले आहे. घाबरट भाजप सरकारने विधानसभेच्या एक दिवसीय कामकाजाचे “राम नाम सत्य है” केले आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.
काँग्रेसचे आमदार ॲड. कार्लोस आल्वारीस फरैरा व एल्टन डिकोस्ता यांच्यासह काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आज पर्वरी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना विरोधी पक्षनेत्यांनी भाजप सरकार विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा वारंवार प्रयत्न करत असल्याबद्दल सरकारवर टीका केली.
30 मार्च 2023 रोजी रामनवमीची सुट्टी जाहीर करणे ठीक होते परंतु सरकारने अधिवेशनाचा दिवस वाढवून कामकाजाचे वेळापत्रक बदलायला हवे होते. अधिवेशन रोखण्याची सरकारची कृती भ्याडपणाची आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
वेळापत्रकात बदल झाल्याने विविध खात्यांशी संबंधित प्रश्न मांडण्यावर बंधने आली आहेत. पहिल्या दिवशी 19 खाती, दुसऱ्या दिवशी 14, तिसऱ्या दिवशी 16 आणि चौथ्या दिवशी 13 खात्यांवर प्रश्न विचारावे लागतील. दररोज फक्त 3 तारांकित प्रश्न आणि 15 अतारांकित प्रश्न मांडण्याची मर्यादा आहे, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.
म्हादई, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतीत वाढ, रस्त्यांच्या निकृष्ट पायाभूत सुविधांमुळे होणारे जीवघेणे रस्ते अपघात, गुन्ह्यांमध्ये वाढ, प्रस्तावित वीज दरवाढ, ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे सूचित करण्यात आलेले अपयश यांसारखे लोकांचे प्रश्न आम्ही मांडणार आहोत. नगर नियोजन कायद्याचे उघड उल्लंघन, जुने गोव्यातील बेकायदेशीर बंगला पाडण्यात अपयश, स्मार्ट सिटी प्रकल्पातील भ्रष्टाचार इत्यादी प्रश्नांवर आम्ही सरकारला घेरणार आहोत युरी आलेमाव यांनी नमूद केले.
हळदोणचे आमदार अॅड. कार्लोस आल्वारीस फरैरा यांनी सांगितले की, सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. सर्वत्र नियमांचे उल्लंघन केल्याची उदाहरणे वारंवार पाहायला मिळतात. गॉडफादरच्या आशीर्वादाशिवाय हे होऊ शकत नाही. बेकायदेशीर कामांना भाजपमधील बॉसचे समर्थन असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रभू श्रीराम आपल्यासोबत आहेत.आपण भाग्यवान आहोत की रामनवमी शुक्रवारी नाही तर गुरुवारी आहे. आम्ही खाजगी सदस्यांच्या कामकाजाची आणखी एक संधी गमावली असती, असा दावा केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी केला. ते म्हणाले की, विरोधी पक्षाचे सर्व आमदार यावेळीही जनतेचे प्रश्न मांडतील.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावेळी बोलताना आपण इतर सर्व विरोधी आमदारांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधतील आणि सर्वजण एकजुटीने सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती तयार करतील. मागील विधानसभा अधिवेशनाप्रमाणेच विरोधी पक्षाच्या आमदारांची कामगिरी लोकांना दिसेल, असे ते म्हणाले.